पालिकेकडून राणेंचा बंगला वाचवण्याचा प्रयत्न! तक्रारदार दौंडकर यांचा आरोप, मुख्यमंत्र्यांना पत्र

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जुहू येथील ‘अधीश’ बंगल्यातील बेकायदा बांधकाम वाचवण्याचा प्रयत्न पालिकेकडूनच होत असल्याचा आरोप तक्रारदार दौंडकर यांनी केला आहे. याबाबत दौंडकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्र देऊन लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

नारायण राणे यांच्या जुहू येथील बंगल्यात बेकायदेशीरपणे बांधकाम केल्याची तक्रार तक्रारदार दौंडकर यांनी केली आहे. यानंतर पालिकेच्या के/पश्चिम कार्यालयाकडून बंगल्याची पाहणी केल्यानंतर 15 दिवसांत अनधिकृत बांधकाम हटवण्याची नोटीस राणे यांना बजावण्यात आली आहे.

दरम्यान, पालिकेने 15 दिवसांची नोटीस दिल्यानंतर पुन्हा चार दिवसांनी नोटीस बजावली. त्यामुळे पालिका राणे यांचा बंगला वाचवण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचा आरोप दौंडकर यांनी केला आहे. सागरी किनारा संरक्षण क्षेत्राचे उल्लंघन केले असताना कारवाईस दिरंगाई होत असल्याचे पत्र अ‍ॅड. वाय. पी. सिंग यांनी तक्रारदार दौंडकर यांच्या वतीने पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना दिले आहे.