अवघा रंग एक झाला…शिर्डीला साई मंदिरात परंपरेनुसार रंगपंचमी उत्सव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रंगपंचमी सणानिमित्त साईबाबांच्या मूर्तीला आकर्षक वस्त्र्ा आणि अलंकार परिधान करण्यात आले असून, साईमूर्तीवर रंगांची उधळण करण्यात आली. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे शिर्डीत रंगपंचमी उत्सव साजरा केला नाही. यंदा मात्र परंपरेनुसार रंगपचंमी उत्सव भाविकांसह मोठय़ा जल्लोषात साजरा करण्यात आला.

पारंपरिक वाद्यांच्या गजरात द्वारकामाई मंदिरातून साईबाबांच्या रथाची मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये शिर्डीकरांसह हजारो साईभक्त सहभागी झाले होते. ही मिरवणूक रंगपंचमीचे मुख्य आकर्षण ठरली. तर, यावेळी एकमेकांना रंगाने चिंब भिजवीत ढोल-ताशांच्या तालावर साईभक्तांनी ठेका धरला.

याप्रसंगी साई संस्थानचे विश्वस्त डॉ. एकनाथ गोंदकर, सचिन गुजर, ऍड. अविनाश दंडवते, सुहास आहेर, उपकार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे, शिवाजी गोंदकर, सचिन तांबे, रवींद्र गोंदकर, संजय अप्पा शिंदे, ताराचंद कोते, सचिन कोते, गजानन शेर्वेकर, सर्जेराव कोते, आदींसह शिर्डी ग्रामस्थ व भाविक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

जेजुरी गडावर रंगपंचमी साजरी

साऱया महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीचा खंडोबा गडावर आज रंगपंचमीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. नेहमी पिवळ्याधमक हळदीच्या सोनेरी रंगात असणारे खंडोबा व म्हाळसादेवी आज मात्र रंगपंचमी निमित्त विविध आकर्षक रंगात न्हाहून निघाले.

पहाटे खंडोबाची भुपाळी, आरती, पूजा करण्यासाठी पुजारी, नित्य सेवेकरी, ग्रामस्थ गडावर आले. त्यांनी विविध रंगांनी मंदिराचा सारा गाभारा सजविला. देवांना स्नान झाल्यावर उपस्थित भक्तांनी रंगीबिरंगी नैसर्गिक रंगांची मुक्त उधळण केली. मार्तंड भैरवाच्या मूर्तीला लाल, केशरी, निळा आदी रंग लावल्याने देवाचे रूप अधिकच खुलून दिसू लागले. दररोज ‘सदानंदाचा येळकोट’ असा जयघोष करीत पिवळ्याधमक भंडाऱयाची उधळण होते. आज मात्र देवाचा जयघोष करीत भाविक विविध रंग खेळताना दिसले.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दोन वर्षे मंदिर बंद होते. त्यामुळे गडावर कोणालाही जाता येत नव्हते, सण उत्सवावर बंदी होती. आज मात्र मुक्तपणाने भाविकांनी विविध रंगांची उधळण करून रंगपंचमीचा सण उत्साहाने साजरा केला.

पंढरीत रंगोत्सवाची सांगता

श्री विठ्ठल-रखुमाई मंदिरात वसंत पंचमी ते रंगपंचमी असा एक महिना रंगपंचमीचा सण साजरा केला जातो. यानिमित्त देवाच्या अंगावर दररोज केशर व गुलाब पाण्याच्या रंगाची उधळण केली जाते. जगाच्या पाठीवर एक महिना रंगपंचमीचा सण साजरा करणारे श्री क्षेत्र पंढरपूर हे एकमेव देवस्थान आहे.

सलग महिनाभर रंगांच्या या उत्सवाची सांगता रंगपंचमीला होते. श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव, पोलीस उपअधीक्षक विक्रम कदम, तहसीलदार सुशील बेल्हेकर, मुख्याधिकारी अरविंद माळी यांच्या हस्ते यमाई तलाव येथे श्री विठ्ठलाच्या मूर्तीचे पूजन करून रंगपंचमी सोहळ्याला प्रारंभ करण्यात आला. या सोहळ्यात पंढरपूरकरांसह वारकरी व भाविक मोठय़ा संख्येने सहभागी होतात. श्री विठ्ठल मूर्तीच्या पूजनानंतर लावण्यात आलेल्या डीजेच्या तालावर उपस्थित अबालवृद्धांनी ठेका धरला.

सातारकरांनी केली रंगांची मनसोक्त उधळण

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन वर्षांत रंगपंचमीवर मर्यादा आली होती. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने निर्बंध शिथिल करण्यात आले. त्यामुळे सातारकरांनी रंगांची मनसोक्त उधळण करत आणि एकमेकांना रंगांनी रंगवून टाकत ‘अवघा रंग एक झाला’ हे दाखवून दिले. सातारा शहरासह संपूर्ण जिह्यात रंगपंचमीचा उत्साह द्विगुणित झाल्याचे चित्र होते. चौकाचौकात तसेच विविध मैदानांवर रंगपंचमीच्या कार्यक्रमांचे आयोजन केले होते. त्यामध्ये तरुणाईचा उत्साह ओसंडून वाहत होता. बालगोपाळांनीही पिचकाऱयांनी विविध रंगांनी रंगवत रंगपंचमीचा आनंद लुटला. व्यापारी बांधवांनी उत्साहात रंगपंचमी साजरी केली. त्यामुळे शहरातील बहुतेक दुकाने मंगळवारी बंदच होती. विविध रंगांनी माखलेले तरुण-तरुणींचे घोळके शहरात रस्त्यांवरून फिरताना दिसत होते.

कोल्हापुरात आबालवृद्धांची उत्साहात रंगपंचमी

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने जिह्यात यंदा रंगपंचमी धूमधडाक्यात आणि आबालवृद्धांच्या अमाप उत्साहात सर्वत्र साजरी करण्यात आली. यासाठी गेल्या आठवडाभरापासून विविध रंग व पिचकाऱयांनी बाजारपेठा गजबजल्या होत्या. तर, मंगळवारी सकाळपासूनच प्रत्येक गल्लीबोळात रंगपंचमी खेळण्यात आबालवृद्ध व तरुण दंग झाले होते. काही ठिकाणी डीजेच्या तालावर महिलावर्गासाठी विशेष रंगपंचमीचे आयोजन करण्यात आले होते. कोठेही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्तही तैनात करून नाकाबंदी करण्यात येत होती.