
कर्नाटक येथील महाविद्यालयात डी. फार्मला प्रवेश देतो असे सांगून फसवणूक करणाऱ्या खासगी महाविद्यालयाच्या प्राध्यापकाला कुरार पोलिसांनी अटक केली. मुटुटून ऊर्फ संजय केशवप्रसाद दुबे असे त्याचे नाव आहे.
तक्रारदार तरुण हा कांदिवलीच्या क्रांतीनगर येथे राहतो. त्याचे बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण झाले होते. त्याला बारावीनंतर डी. फार्ममध्ये प्रवेश हवा असल्याने त्याने सीईटीची परीक्षादेखील दिली होती. तरुणाला कमी गुण मिळाल्याने त्याला प्रवेश मिळाला नव्हता. मालाड येथे खासगी क्लासेसमध्ये शिकवणारा एक प्राध्यापक हा डी. फार्मचे प्रवेश मिळवून देतो अशी माहिती त्या तरुणाला मिळाली. त्या माहितीनंतर तरुणाच्या कुटुंबीयांनी मुटुटूनची भेट घेतली. आपली कर्नाटक येथे ओळख असून तेथील कॉलेजमध्ये मुलाला प्रवेश मिळवून देतो अशा त्याने भूलथापा मारल्या. त्यावर तरुणाच्या कुटुंबीयांनी विश्वास ठेवला.
प्रवेशाच्या नावाखाली मुटुटूनने 1 लाख 70 हजार रुपये घेतले. रक्कम मिळाल्यानंतर मुलाला कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला असून लवकरच कॉलेज सुरू होणार असल्याचा तो भूलथापा मारत होता. या आठवडय़ात डी. फार्मची परीक्षा असल्याने तरुणाने हॉल तिकिटाबाबत विचारणा केली असता तो टाळाटाळ करू लागला. काही कारणास्तव प्रवेश मिळाला नाही असे त्याने तरुणाला सांगितले. हा प्रकार ऐकून तरुणाला धक्काच बसला. त्याने याची माहिती त्याच्या पालकांना दिली. त्यानंतर पालकांनी कुरार पोलीस ठाण्यात धाव घेतली.
कुरार पोलिसांनी मुटुटूनविरोधात गुन्हा नोंद करून तपास सुरू केला. वरिष्ठ निरीक्षक सतीश गाढवे यांच्या पथकातील उपनिरीक्षक सविता थोरात यांनी तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांनी मुटुटूनला कुरार परिसरातून अटक केली. त्याने आतापर्यंत 17 विद्यार्थ्यांची फसवणूक केल्याची माहिती तपासात समोर आली आहे.



























































