
अनेकदा नोटीस बजावून देखील लाखो रुपयांचा थकीत मालमत्ता कर न भरणाऱ्या फोर्ट येथील इमारत मालकाने पालिकेच्या कर निर्धारण व संकलन विभागाच्या अधिक्षकाला मारहाण केल्याची घटना बुधवारी घडली. याप्रकरणी अधिक्षक दशरथ घरवाडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून हल्लेखोर इमारत मालक अश्विनकुमार शहा याच्या विरोधात माता रमाई आंबेडकर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अश्विनकुमार शहा यांच्या फोर्ट परिसरात तीन इमारती आहेत. त्यापैकी हमाम स्ट्रीट येथील किर्ती चेंबर्स इमारत क्रमांक 35 असून या इमारतीचा 43 लाख 76 हजार इतका मालमत्ता कर गेल्या दहा वर्षांपासून थकित आहे. हा थकित मालमत्ता कर भरावा यासाठी अश्विनशहा याला 30 जून 2021 मध्ये पालिकेच्या ए वॉर्डने नोटिस बजावली होती. मात्र तरी शहाने कर भरला नाही. त्यामुळे 17 सप्टेंबर 2021 रोजी पुन्हा कर भरण्याबाबत नोटीस बजावण्यात आली होती. परंतू शहा याने नोटिशींची दखल घेतली नाही. परिणामी बुधवारी सांयकाळच्या सुमारास घरवाडे हे त्यांच्या सहकाऱ्यांसह किर्ती चेंबर्स, इमारत क्रमांक 35 येथे गेले.
पुढील 48 तासांच्या आत कर भरणा केला नाही तर इमारतीची सेव्हरेज लाईन बंद करण्यात येईल, अशी नोटिस इमारतीमधील 19 खोल्यांच्या दर्शनी भागावर त्यांनी चिटकवली. तसेच अश्विनच्या कारवरही नोटिस चिटकवून चाकाला लोखंडी अटकावणी लावली. त्यानंतर तेथे आलेल्या अश्विन शहा, त्याचा चालक व अन्य एकाने घरवाडे यांना घेरून मारहाण केली. या हल्ल्यात घरवाडे यांच्या चेहऱ्यावर, हातावर व पाठीवर मारण्यात आले. यात घेरवाडे यांच्या डोळ्याच्या बाजूला दुखापत झाली आहे.























































