
कल्याण पश्चिमेच्या वाडेघर डम्पिंग ग्राउंडवरील कचऱ्याला गुरुवारी संध्याकाळी साडे सहाच्या सुमारास अचानक आग लागली होती. हि आग नेमकी कशामुळे लागली त्याचे अद्याप समजू शकलेले नाही. ही आग इतकी मोठी होती की दूरवरून धुराचे लोट दिसत होते. घटनेची माहिती मिळताच कल्याण अग्निशमन दलाच्या २ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी युद्धस्तरावर प्रयत्न केले. अखेर रात्री उशिरा आगीवर नियंत्रण मिळवण्यात जवानांना यश आले. या आगीमुळे परिसरातील रहिवाशांना धुराचा प्रचंड त्रास होऊ लागला. तसेच वारंवार लागणाऱ्या आगीमुळे डंपिंग ग्राउंड परिसरातील रहिवासी कमालीचे हैराण झाले आहेत. हे डम्पिंग ग्राउंड या भागातून हा हटवा अशी मागणी सामान्य नागरिकांकडून होत आहे.





























































