
कोरोना नियंत्रणात असला तरी काही देशांमध्ये आलेल्या ओमायक्रोनच्या सब-व्हेरिएंटमुळे केंद्र सरकारने 18 वर्षांवरील सर्व लाभार्थ्यांना कोरोना प्रतिबंधक ‘प्रिकॉशन डोस’ देण्याचा निर्णय घेतला असून नियोजन सुरू केले आहे. त्यामुळे पालिकेनेही 200 केंद्रांवर ‘प्रिकॉशन डोस’ देण्याची तयारी असल्याचे स्पष्ट केले आहे. मुंबईत 18 वर्षांवरील 92 लाख 36 हजार लाभार्थी आहेत.
मुंबईत मार्च 2020 मध्ये कोरोनाने शिरकाव केल्यानंतर सुमारे वर्षभराने 16 जानेवारी 2021 रोजी लसीकरणाला सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात हेल्थ कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर्स आणि त्यानंतर 18 वर्षांवरील सर्वांना डोस देण्यात येत आहेत. या लसीकरणात आतापर्यंत 100 टक्के जणांचा पहिला डोस झाला असून 99 टक्के जणांचा दुसरा डोसही देण्यात आला आहे, तर 60 वर्षांवरील नागरिक, आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर्सना पहिली लस घेऊन 90 दिवस झाले असल्यास ‘प्रिकॉशन डोस’ देण्यात येत आहे. आतापर्यंत 3 लाख 84 हजार 794 जणांना प्रिकॉशन डोस देण्यात आला आहे.
‘प्रिकॉशन’ डोस देण्याचे निर्देश केंद्राने दिल्यास पालिका तातडीने आवश्यक कार्यवाही करून लसीकरण सुरू केले जाईल. यासाठी आवश्यक लसीकरण केंद्रे वाढवण्यात येतील.
– सुरेश काकाणी, अतिरिक्त आयुक्त
आतापर्यंत दिले 2 कोटी डोस
z पालिकेच्या माध्यमातून लसीकरण सुरू झाल्यानंतर आतापर्यंत 2 कोटी 4 लाख 50 हजार 938 डोस देण्यात आले आहेत. z यामध्ये 12 ते 18 वर्षे वयोगटासाठी 15 हजार 239 जणांना कोरोना प्रतिबंधक लसीचा डोस देण्यात आला आहे.
































































