
>>गणेश उदावंत
कवितेच्या प्रांतात गझल लेखन काव्यप्रकार विशेष अभ्यासपूर्ण राहिलेला आहे. अत्तराचा बारीक थेंब जरी कपडय़ावर पडला तर खोलीभर सुंगध पसरायला वेळ लागत नाही. तसेच गझलेचे आहे. व्यंकटेश कुलकर्णी यांचा हैदराबाद येथे ‘मराठी साहित्य कट्टा’ नावाने साहित्यप्रेमींना अभिव्यक्त होण्यासाठीचा मंडळवजा उपक्रम आहे. कविता लिखाणाच्या आवडीतून ते नेहमी विविध उपक्रम राबवीत असतात.
व्यंकटेश कुलकर्णी यांचा नुकताच ‘…अन् बरंच काही’ हा गझल-गीतसंग्रह प्रकाशित झाला आहे. या संग्रहातील सर्वच कविता व गझला अंतर्मनाचा ठाव घेणाऱया ाैडव्यांची सुंदर कविता आहे. लेक लाडकी लग्नानंतर निघे सासरी, असा साधा विचार सांगताना किती मोठा अर्थ सांगून जाणारी ‘घ्या सांभाळून’ ही गझल सामाजिक दांभिकतेवर भाष्य करणारी आहे.
कवितेच्या विविध प्रकारांनी व्यंकटेश कुलकर्णी यांचा काव्यसंग्रह वाचनीय झाला आहे. साधी, सोपी भाषा, गझलेत शेर पेश करताना कुठेही आततायीपणा केलेला नाही. गझलेत आकृतीबंधाला ठेच न पोहोचू देता दाखवलेला सामंजसपणा आणि नेटकेपणा वाचकास खिळवून ठेवणारा आहे. हे या काव्यसंग्रहाचे विशेष होय.
लिहिता लिहिता लिहीत गेलो
लिहिले काही पुसले काही ।
असे कवी म्हणतो ते खरेच आहे. एकूण 96 पानांचा हा काव्यसंग्रह असून तब्बल 8 कविता, 25 अभंग, लावणी प्रकारात मोडणाऱया काव्यांनी काव्यसंग्रह. सदानंद डबीर यांची मुद्देसूद प्रस्तावना आहे.
व्यंकटेश कुलकर्णी यांचा हा पहिला काव्यसंग्रह असून तो रसिकमान्य होईल, अशी आशा बाळगू या.
…अन् बरंच काही
लेखक:- व्यंकटेश कुलकर्णी
प्रकाशक:- समीक्षा पब्लिकेशन
पृष्ठ :- 96, मूल्य:- रुपये 120/-



























































