नोटांच्या नावाखाली 20 लाखांची केली फसवणूक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दोन हजार रुपयांच्या नोटांच्या बदल्यात शंभर रुपयांच्या नोटा देतो असे सांगून एका हॉटेल व्यावसायिकाची 20 लाख रुपयांची फसवणूक झाल्याची घटना घडली आहे. फसवणूकप्रकरणी पार्कसाईट पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

तक्रारदार हे हॉटेल व्यावसायिक असून त्यांचे एक हॉटेल आहे. सांताक्रुझ येथील खासगी बँकेत ते पैसे जमा करणे आणि काढण्यासाठी नेहमी जात असायचे. नेहमी ये-जा असल्याने त्यांची बँकेच्या मॅनेजरशी ओळख झाली होती. व्यवसायात शंभर रुपयांच्या नोटांची गरज असल्याचे व्यावसायिकाने हॉटेलच्या मॅनेजरला सांगितले होते. काही दिवसांपूर्वी बँक मॅनेजर हे एका महिलेसोबत व्यावसायिकाच्या हॉटेलमध्ये आले होते. मॅनेजरने त्या महिलेचा व्यावसायिकाला परिचय करून दिला होता.

महिलेने आपल्या परिचित असलेल्या एकाकडे मंदिरातील शंभर रुपयांच्या नोटा आहेत. त्या नोटांच्या मोबदल्यात त्यांना पाचशे रुपयांच्या नोटा हव्या असल्याचे व्यावसायिकाला सांगण्यात आले. गेल्या आठवडय़ात महिलेने तिच्या परिचित व्यक्तीकडून व्यावसायिकाला पाच लाख रुपयांच्या शंभर रुपयांच्या नोटा दिल्या होत्या. त्यानंतर दोन दिवसांनी महिलेने दोघांना आणखीन वीस लाख रुपये दोन हजार रुपयांच्या स्वरूपात हवे असून सांगितले होते. शंभर रुपयाच्या नोटा मिळतील या आशेने तक्रारदार हे 20 लाख रुपये घेऊन विक्रोळी येथे आले होते. तेथे तीन जण आले. त्या तिघांनी वीस लाख रुपये घेतले. शंभर रुपयांच्या नोटा घेऊन येतो असे सांगून ते मोटारसायकलवरून पळून गेले. या प्रकरणी पार्कसाईट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.