प्रमोद सावंत यांनी गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून घेतली शपथ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

डॉ. प्रमोद सावंत यांनी आज गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून दुसऱ्यांदा शपथ घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झालेल्या सोहळ्याला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, हरियाणाचे मुख्यमंत्री एमएल खट्टर, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी आदी दिग्गज नेते उपस्थित होते. ताळगाव येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमममध्ये भाजप सरकारचा शपथविधी सोहळा पार पडला. सोहळ्याला स्टेडियममध्ये हजारो लोकांची उपस्थिती होती.

मुख्यमंत्री सावंत यांच्यासह विश्वजित राणे, माविन गुदिन्हो, रवी नाईक,नीलेश काब्राल, बाबूश मोन्सेरात,रोहन खंवटे, गोविंद गावडे यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. पहिल्या टप्प्यात भाजपा सरकारला पाठिंबा दिलेल्या मगो आणि 3 अपक्षांना स्थान देण्यात आलेले नाही. 3 मंत्री पदे रिक्त ठेवण्यात आली असून त्यात सरकारला समर्थन देणाऱ्या मगो आणि अपक्ष आमदारांना स्थान दिले जाण्याची शक्यता आहे.

गोवा विधानसभा निवडणुकांचा निकाल लागून 18 दिवस झाले. या निवडणुकीत गोमंतकीय जनतेने भाजपला विधानसभेच्या एकूण 40 पैकी 20 जागांवर विजयी केले असून, भाजपच्या सरकारला तीन अपक्ष आणि 2 आमदार असलेल्या मगो पक्षाने बिनशर्त पाठिंबा जाहीर केला.