शेतकर्‍यांना उद्ध्वस्त करण्याचा डाव, अदानीच्या बंदराविरोधात अलिबागकर आक्रमक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अदानी उद्योग समूहाने धरमतर खाडीत बंदर उभारण्याचा घाट घातला आहे. हे बंदर शेतकर्‍यांना उद्ध्वस्त करणारे असल्याने या बंदराविरोधात अलिबागकर आक्रमक झाले आहेत. शहाबाजमधील 130 एकर जमीन अदानी समूहाने खरेदी केली आहे. सिमेंट पुरवठा करण्यासाठी अदानी समूह या जमिनीचा वापर गोदाम म्हणून करणार आहे. धरमतर खाडीतील बंदर म्हणूनच अदानी समूहाला आवश्यक आहे. मात्र भूमिपुत्रांचे अस्तित्व यामुळे धोक्यात येणार आहे. त्यामुळे 18 एप्रिलला होणारी जनसुनावणी उधळण्याचा इशारा शेतकर्‍यांनी दिला आहे.

अदानी सिमेंट प्रकल्पासाठी दोन वेळा पर्यावरणविषयक सुनावणी घेण्याचा प्रयत्न पर्यावरण विभागाने केला होता. पैकी 26 मार्च 2020 रोजीची जनसुनावणी कोरोनामुळे रद्द झाली. तर 26 मार्च 2021 ची सुनावणी शेतकर्‍यांच्या विरोधामुळे रद्द करावी लागली. आता तिसर्‍यांदा 18 एप्रिल रोजी पांडवादेवी-पोयनाड येथील जय मंगल कार्यालयात सुनावणी जाहीर केली आहे. मुळात याच परिसरातून महामुंबई सेझ, रिलायन्स एनर्जी, टाटा पॉवर यांसह अन्य कंपन्यांना हद्दपार केल्याचा इतिहास आहे. आता अदानी समूहाच्या विरोधात शेतकर्‍यांनी तीव्र लढा पुकारला आहे.

शहाबाज परिसरात अदानी समूहाने 130 एकर जमीन खरेदी केली आहे. शिवाय याच ठिकाणी असलेल्या सरकारी जमिनीवरही अदानी समूहाचा डोळा आहे. मुळात येथील 150 एकर जमीन शहाबाज ग्रामपंचायतीच्या ताब्यात आहे. ही जमीन मिळावी यासाठी अदानी समूह आग्रही आहे. मात्र ही जमीन देण्यास ग्रामस्थांचा टोकाचा विरोध आहे. मच्छीमार संघटनांनीदेखील याला हरकत घेतली आहे. बंदराला सर्वांचा विरोध असताना प्रशासन मात्र जनसुनावणी घेण्यासाठी आग्रही का, असा सवाल शहाबाज संघर्ष समितीचे अध्यक्ष द्वारकानाथ पाटील यांनी केला आहे.

डाव उधळून लावू

दोन वेळा जनसुनावणी रद्द झाल्यानंतर आता तिसर्‍यांदा ती होत आहे. या ठिकाणी सिमेंट कारखाना नसून तेथे बंदरातून येणार माल साठवून ठेवला जाणार आहे, अशी माहिती अदानी समूह देत असला तरी ग्रामस्थांचा मात्र यावर विश्वास नाही. बंदराच्या आडून शेतकर्‍यांना उद्ध्वस्त करण्याचा डाव कदापि यशस्वी होऊ देणार नाही, असा इशारा संघर्ष समितीने दिला आहे.