
कल्याण-शीळ मार्गावरील वाहतूककोंडी कमी करण्यासाठी केडीएमसीने पावले उचलली आहेत. मलंग रोड ते उल्हासनगर या शंभर फुटी रस्त्याच्या कामाला गती दिली आहे. रस्त्याचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यासाठी पालिकेचे नियोजन आहे. रस्ते विकासाला मारक ठरणारी बेकायदा बांधकामे तोडून प्रशस्त रस्ता केला जात आहे.
कल्याण-डोंबिवली स्मार्ट सिटी करण्यासाठी केडीएमसीने सूत्रबद्ध कार्यक्रम हाती घेतला आहे. त्यानुसार रस्ते विकासाला प्राधान्य दिले आहे. वाहतूककोंडी मुक्त शहर करण्यासाठी अतिक्रमणे हटवून मलंग रोड ते उल्हासनगर हा शंभर फूट रुंद रस्ता केला जात आहे. हा रस्ता पुणे लिंक रस्त्याला समांतर यामुळे मुख्य मार्गावरील वाहतूककोंडी कमी होणार आहे. महत्त्वाचे म्हणजे शंभर फुटी रोडमुळे कल्याण-शीळ मार्गावरील ट्र्रॅफिकचा प्रश्न सुटणार आहे. पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी नुकतेच या रस्ता कामाची पाहणी केली. श्रीमलंग रस्त्याने उल्हासनगर हद्दीपर्यंत फिरून त्यांनी कामाचा आढावा घेतला. या रस्त्यामधील फ्रेंडस् सोसायटी बाधित होत असल्याने येथील रहिवाशांचे तसेच अन्य बाधित भूखंडधारकांचे त्यांनी म्हणणे ऐकून घेतले. रस्त्याच्या रूपरेषेबाबत येत्या आठ दिवसांत निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी आश्वासन दिले.
पुणे, मुंबई प्रवास होणार जलद
या शंभर फुटी रस्त्याचे कल्याण पूर्वेतील चिंचपाडा हद्दीपर्यंत रुंदीकरण केले जाणार आहे. रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर दळणवळण सुविधा सुलभ आणि जलद होणार आहे. यामुळे उल्हासनगरवरून पुणे किंवा मुंबईकडे जाणाऱ्या नागरिकांना हा रस्ता सोयीचा ठरणार आहे. कल्याण-शीळ मार्गावरील वाहतुकीचा ताणही आपसूकच कमी होणार आहे.





























































