
सततच्या दुष्काळी परिस्थितीमुळे एकेकाळी पिण्याच्या पाण्याच्या अभूतपूर्व टंचाईने पिण्याच्या पाण्यासाठी तहानलेल्या शेवगाव तालुक्याची गेल्या काही वर्षांत टँकरमुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. गेल्या दोन वर्षांपासून तालुक्यात झालेला समाधानकारक पाऊस, तसेच गावोगावच्या पाणीपुरवठा योजनांच्या यशस्वितेतून तालुक्याची टँकरमुक्तीच्या दिशेने दमदार वाटचाल सुरू आहे.
जायकवाडी जलाशयाच्या अगदी उशाला असलेल्या शेवगाव तालुक्यात पिण्याच्या पाण्यासाठी प्रत्येक वर्षी जनतेला विविध प्रकारच्या समस्या व अडचणींचा सामना करावा लागला. प्रत्येक वर्षी तालुक्यातील विविध गावांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला. शेवगाव व पाथर्डी या दोन्ही तालुक्यांच्या गावांसह 54 गावांची प्रादेशिक नळपाणीपुरवठा योजना, तसेच हातगाव व 28 गावे, शहरटाकळी व 24 गावे, तसेच बोधेगावसह नजीकच्या सात गावांसाठी कार्यान्वित असलेल्या प्रादेशिक नळपाणीपुरवठा योजनांपैकी शेवगाव-पाथर्डी प्रादेशिक नळपाणीपुरवठा योजना आता कालबाह्य झाली आहे. शासनाने शेवगाव व पाथर्डी शहरांसाठी नव्याने प्रादेशिक योजनेला मंजुरी दिलेली आहे. याशिवाय शहरटाकळी योजना वीज बिलाच्या थकबाकीमुळे बंद आहे. हातगाव योजना अपूर्ण आहे. बंद असणाऱया प्रादेशिक नळपाणीपुरवठा योजना पूर्ववत राहण्यासाठी लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करण्याची अपेक्षा जनतेतून व्यक्त होत आहे.
शेवगाव तालुक्यात 29 गावांत स्वतंत्र पाणीपुरवठा योजना आहे. मावळत्या जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्री घुले, पंचायत समिती सभापती डॉ. क्षितिज घुले यांनी राष्ट्रीय पेयजल योजनेतून तालुक्यातील वरूर, खरडगाव, निंबे नांदुर येथे स्वतंत्र पिण्याच्या पाण्याच्या योजना केल्या. तसेच जलसिंचन योजनेतून तालुक्यातील भायगाव, दहीगाव, गोळेगाव, नागलवाडी, कोनोशी, खामपिंपरी, खानापूर, मळेगाव शे, विजयपूर, मुंगी, वडुले, वाघोली येथे स्वतंत्र पाणी योजना मंजूर केल्या. गेल्या पाच वर्षांत तालुक्यात टँकरवर 22 कोटी 16 लाख रुपये खर्च झाला असून, यंदा तो जवळपास शून्यावर येऊन ठेपला आहे.
तालुक्यात 2015-16मधे टंचाईग्रस्त 52 गावांसाठी 69 टँकर कार्यान्वित होते. 2016 – 17मध्ये पाच गावांत नऊ टँकर होते. 2018-19मध्ये 50 गावांसाठी टँकरची संख्या 69पर्यंत जाऊन पोहोचली होती. त्यानंतर 2019-20मध्ये तीन गावांसाठी चार टँकर सुरू होते. मागील वर्षी 2020– 21मध्ये टँकरची संख्या निरंक राहिली. यंदा नागलवाडी हे एकमेव गाव टंचाई आराखडय़ात असल्याची माहिती टंचाई शाखेतून देण्यात आली.
समाधानकारक पावसामुळे भूजलपातळीत वाढ
गेल्या दोन वर्षांपासून तालुक्यात होणाऱया समाधानकारक पावसामुळे तालुक्याच्या काही भागात झालेली अतिवृष्टी व पूरस्थिती यांमुळे भूजलपातळीत समाधानकारक वाढ दिसत आहे. या कारणांमुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काही अंशी आटोक्यात आल्याचे समाधानकारक चित्र दिसत आहे. तालुक्यातील नागलवाडी हे गाव डोंगरावर असल्याने या गावासाठी कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्याचा स्रोत निर्माण करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे भविष्यात तालुक्यातील पाणीटंचाई कायमस्वरूपी संपुष्टात येण्याची चिन्हे दिसत आहेत.





























































