कापडबाजार कायमस्वरूपी अतिक्रमण मुक्त होणार, नगर मनपाच्या आश्वासनानंतर व्यापाऱ्यांचे आंदोलन स्थगित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नगर शहरातील कापड बाजारासह संपूर्ण बाजारपेठेत अतिक्रमण करून व्यवसाय करणाऱया फेरीवाल्यांचा कायमचा बंदोबस्त करून बाजारपेठेचा श्वास मोकळा करण्याची मागणी करीत व्यापारी महासंघाने केलेले उपोषण आंदोलन यशस्वी झाले आहे. मंगळवारी सायंकाळी आयुक्त शंकर गोरे यांनी उपोषणस्थळी येत व्यापारी महासंघाच्या सर्व मागण्यांवर तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. मनपाच्या वतीने अतिक्रमणे हटाव मोहिमेत सातत्य ठेवण्याचे तसेच मोची गल्ली परिसरातील स्वच्छतागृहाचा प्रश्नही मार्गी लावण्याचे आश्वासन देण्यात आले.

कापडबाजार तसेच शेजारील बाजारपेठेचा परिसर हा नगर शहराचा आर्थिक कणा आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या परिसरातील व्यापाऱयांना रस्त्यावरील अनधिकृत फेरीवाले, हातगाडीवाले यांचा त्रास सहन करावा लागत आहे. अनेकदा ही मंडळी गुंडगिरी करतात. त्याचा त्रास ग्राहकांनाही होत असतो. त्यामुळे महापालिकेने संपूर्ण बाजारपेठ कायमस्वरूपी अतिक्रमणमुक्त करावी, ही मागणी घेत बेमुदत उपोषणाचा मार्ग अवलंबला. ज्येष्ठ व्यापारी सुभाष बायड, वसंत लोढा यांनी उपोषण सुरू केले, तर व्यापारी महासंघाचे अध्यक्ष ईश्वर बोरा, केतन मुथा, कुणाल भंडारी, रवी किथानी, लाला किथानी, संतोष गांधी, भैया भांडेकर, हितेश ओबरॉय, चिंटू खंडेलवाल, विक्रम नारंग यांनी एकदिवसीय उपोषण करण्याचा निर्धार केला. तसेच इतर व्यापारीही साखळी उपोषणास बसले होते.

उपोषणस्थळी सकाळपासूनच सर्वच राजकीय पक्षांचे पदाधिकारी, नेते, कार्यकर्ते, विविध संघटनांचे पदाधिकारी, सदस्य, बाजारपेठेतील व्यापाऱयांनी मोठी गर्दी केली व बाजारपेठ वाचविण्यासाठी एकजुटीने लढा देण्याचा निर्धार केला. शिवसेनेचे शहरप्रमुख संभाजी कदम, आमदार संग्राम जगताप, भाजपचे भैया गंधे, काँग्रेसचे किरण काळे यांच्यासह विविध संघटनांच्या प्रमुखांनी व्यापारीवर्गाच्या पाठीशी उभे राहण्याची ग्वाही देत बाजारपेठ कायमस्वरूपी अतिक्रमणमुक्त होण्यासाठी महापालिकेकडे पाठपुरावा करण्याची ग्वाही दिली.

मंगळवारी सायंकाळी मनपा आयुक्त शंकर गोरे, उपायुक्त डांगे, पोलीस उपअधीक्षक कातकडे, पोलीस निरीक्षक संपत शिंदे आदींनी उपोषणस्थळी येऊन चर्चा केली. व्यापारी महासंघाने सर्व मागण्यांची पूर्तता होईपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचा निर्धार व्यक्त केला. त्यामुळे अधिकाऱयांनी कोअर कमिटीशी चर्चा करून अतिक्रमण हटविण्याची कार्यवाही तातडीने सुरू करण्याबाबत लेखी आश्वासन दिले. यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.

गेल्या अनेक वर्षांपासून अर्ज, विनंत्या करूनही बाजारपेठेतील अतिक्रमणांची समस्या सुटली नव्हती. मात्र, यावेळी व्यापाऱयांनी ठाम निर्धार करीत एकजुटीने आंदोलन करीत महापालिकेला ठोस कारवाई करण्यास भाग पाडले. व्यापाऱयांच्या या आंदोलनाला सर्वच राजकीय पक्ष, विविध संघटना, व्यावसायिक, व्यापारी संघटना, सामाजिक संघटनांनी जाहीर पाठिंबा देत शहराची बाजारपेठ वाचविण्याप्रति कटिबध्दता दर्शवली.

– ईश्वर बोरा, अध्यक्ष, व्यापारी महासंघ, नगर.