
केरळमधील कासारगोड जिल्ह्यातील कन्हानगड येथे एक विचित्र घटना घडली आहे. कन्हानगड येथे हॉटेलमधल्या चार महिन्यांच्या गर्भवती बकरीवर तिघांनी बलात्कार केला. यानंतर लोकं येण्याची चाहूल लागल्याने तिघांनीही या बकरीला मारून टाकले. कोट्टाचेरी परिसरात असणाऱ्या एलिट या हॉटेलमध्ये ही बकरी होती. ही बकरी एका महिन्यानंतर प्रसूत होणार होती. मात्र या तिघा नराधमांनी बकरीला मारून टाकल्याचे होसादुर्गा पोलिसांनी सांगितले.
या गुन्ह्याप्रकरणी आता होसादुर्गा पोलिसांनी त्याच हॉटेलचा कर्मचारी सेंथिल याला अटक केली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून सेंथिलसोबत या घटनेत सहभागी असलेल्या अन्य दोघांचा शोध सुरू आहे.
या प्रकरणी एका अधिकाऱ्याने सांगितले की, बुधवारी मध्यरात्री 1.30 च्या सुमारास हॉटेलच्या मागच्या अंगणात तिघेजण बकरीवर बलात्कार करत होते. यावेळी हॉटेलच्या काही कर्मचार्यांना बकरीचा ओरडण्याचा आवाज आला. जेव्हा ते कर्मचारी बाहेर आले तेव्हा त्यांना तीन जण भिंत ओलांडून धावताना दिसले. हॉटेलचे कर्मचारी धावत येत असल्याची चाहूल लागताच या आरोपींनी बकरीला मारून टाकले.
यावेळी या कर्मचाऱ्यांनी सेंथिलला पकडले. मात्र इतर दोघेजण घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाले. हॉटेलच्या अंगणात ज्या ठिकाणी बकरीला ठेवण्यात आले होते त्या ठिकाणी ती बकरी मृतावस्थेत आढळली. यानंतर होसादुर्ग पोलीस घटनास्थळी दाखल होत त्यांनी सेंथिलला अटक केली. तमिळनाडूचा रहिवासी असलेला सेंथिल हा तीन महिन्यांपूर्वी नोकरीच्या शोधात आला होता. असे हॉटेलच्या मालकाने सांगितले.
प्राण्यांसोबत क्रूरता प्रतिबंधक कायद्याच्या संबंधित कलमांनुसार आणि भारतीय दंड संहिता (IPC) च्या कलम 377 अंतर्गत अनैसर्गिक गुन्ह्याचा आरोप या आरोपींवर लावण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणात दोषी आढळल्यास आरोपीला जन्मठेप किंवा 10 वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते. भारतीय दंड संहितेच्या कलम 377 अंतर्गत प्राण्यांशी संबंध ठेवल्यास शिक्षेची तरतूद असल्याने या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा देखील होऊ शकते.
























































