
राज्यसभेतील तब्बल 72 खासदारांची टर्म संपल्यामुळे गुरुवारी त्यांना निरोप देण्यात आला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या निवृत्त खासदारांच्या कामगिरीचे भरभरून कौतुक केले. तसेच त्यांना ‘आवजो…’ असे गुजराती भाषेत बोलून राज्यसभेत पुन्हा या, असे आपुलकीचे निमंत्रण दिले. ज्ञानापेक्षा अनुभवाची ताकद जास्त असते, अशा शब्दांत त्यांनी निवृत्त सदस्यांच्या कार्याला दाद दिली.
संसदेचे वरिष्ठ सभागृह असलेल्या राज्यसभेतून गुरुवारी 72 खासदार निवृत्त झाले. या नेत्यांमध्ये शिवसेना नेते संजय राऊत, राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल, पी. चिदंबरम, पियूष गोयल, विकास महात्मे आणि विनय सहस्रबुद्धे या महाराष्ट्रातील नेत्यांबरोबरच कपिल सिब्बल, जयराम रमेश, ए. के. ऍण्टनी यांसारख्या अनेक दिग्गज नेत्यांचा समावेश आहे. तसेच भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी हेसुद्धा निवृत्त झाले आहेत. या सदस्यांना निरोप देताना सभागृहात मोदींसह उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, मल्लिकार्जुन खरगे यांनी भाषणे केली. मोदींनी निवृत्त सदस्यांना सभागृहातून बाहेर पडल्यानंतर त्यांच्या अनुभवाचा उपयोग करण्याचा विशेष सल्ला दिला. आमच्या राज्यसभेच्या खासदारांना प्रदीर्घ अनुभव आहे. काहीवेळा शैक्षणिक ज्ञानापेक्षा अनुभव महत्त्वाचा असल्याचे मोदी म्हणाले.
z निवृत्त होत असलेल्या सदस्यांकडे खूप सारा अनुभव आहे. अनुभवामुळे समस्या सोडवण्यासाठी सोपे उपाय सापडतात. अनुभवामुळे चुका कमी होतात. अनुभवाचे वेगळे महत्त्व असते. म्हणूनच जेव्हा अनुभवी साथीदार सभागृहातून जातात तेव्हा सदनाला मोठी कमतरता जाणवते, देशाला जाणवते. अनुभवी लोक जातात तेव्हा उरलेल्या सदस्यांची जबाबदारी वाढते, असेही मोदी म्हणाले.
राजकीय व्यक्ती कधीही निवृत्त होत नाही – खरगे
निरोप समारंभात काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनीही भाषण केले. त्यांनी निवृत्त काँग्रेस खासदारांबद्दलच्या आठवणींना उजाळा दिला. पी. चिदंबरम हे आर्थिक आणि कायदेशीर बाबींचे उत्तम जाणकार आहेत. राज्यसभेत ते नेहमीच गंभीरपणे बोलत, असे ते म्हणाले. राजकीय व्यक्ती कधीही निवृत्त होत नाही. खंबीर राहा, आम्ही सदैव तुमच्या सोबत राहू, असे सांगतानाच त्यांनी ‘विदाई तो है एक दस्तूर पुराना, पर ऐसी छाप छोड़ जाओ की हर कोई गाओ आपका तराना’ असा शेरही ऐकवला.
महापुरुषांनी देशाला खूप दिलेय, आता आपली जबाबदारी आहे!
z यंदा आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतोय. महापुरुषांनी देशाला खूप काही दिले आहे. आता देण्याची जबाबदारी आपली आहे, असे निवृत्त सदस्यांना उद्देशून बोलतानाच आता आपल्याकडे खूप जास्त वेळ असेल. सभापतींचे वेळेचे बंधनदेखील नसेल, असेही मोदी म्हणाले. त्यावर सभागृहात एकच हशा पिकला. तुम्ही अमृत महोत्सवाच्या माध्यमातून नव्या पिढीला मार्गदर्शन कराल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
























































