साहित्य सोहळा -सर्व संप्रदायांची गुढी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> मोहन गोस्वामी (तिवारी)

पहिले विश्वात्मक संत साहित्य संमेलन शक्ती देवतेच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक महत्त्वाचे शक्तिपीठ करवीर निवासिनी अंबाबाईच्या आशीर्वादाने तसेच लोककल्याणकारी जाणता राजा छत्रपती शाहू महाराज यांच्या कर्मभूमीने पावन झालेल्या कोल्हापूरमध्ये 5 आणि 6 एप्रिल 2022 रोजी माजी सैनिक सभागृह कोल्हापूर येथे आयोजित होत आहे. या संमेलनाचे अध्यक्ष सुप्रसिद्ध कीर्तनकार न्यायमूर्ती ह.भ.प. डॉ. मदन महाराज गोसावी हे असून स्वागताध्यक्ष संत वाङ्मयाचे अभ्यासक ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. सदानंद मोरे हे आहेत. या संमेलनाचे वैशिष्टय़ म्हणजे जगभरातील सर्व प्रातिनिधिक धर्म धारणा, पंथ, उपपंथ, संप्रदाय यांचे विचारमंथन संमेलनात होणार आहे. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सुमारे अडीचशे अभ्यासक विश्वात्मक संत साहित्य संमेलनात सहभागी होणार असून काही देशांचे राजदूत तसेच विदेशी अभ्यासकदेखील संमेलनात आपले विचार प्रगट करणार आहेत. या संमेलनाविषयी संमेलनाध्यक्ष ह.भ.प. न्यायमूर्ती मदन महाराज गोसावी यांनी आपली भूमिका मांडताना स्पष्ट केले ‘उजळावया आलो वाटा’ हा ग्रंथ संमेलनात प्रकाशित होणार असून संत साहित्यविषयक अनेक लेखांचा समावेश या ग्रंथात झालेला आहे. मराठी, हिंदी, इंग्रजी आणि संस्कृत या चारही भाषांमधील लेख या ग्रंथात समाविष्ट करण्यात आले आहेत. या संमेलनात ‘भक्ती संप्रदाय विश्वात्मकता’, ‘भक्ती निष्ठा की व्यवसाय?’, ‘अस्वस्थ वर्तमानात संत विचारांची भूमिका’, ‘संत साहित्य व लोकतत्त्व’, ‘संत साहित्य आणि पर्यावरण’ या विषयांवर परिसंवाद होणार असून डॉ. शैलेंद्र श्रीवास्तव, डॉ. जयवंत महाराज बोधले, डॉ. रामचंद्र देखणे, उल्हासदादा पवार, डॉ. रामकृष्ण महाराज लहवितकर, डॉ. गणेश चंदनशिवे, प्रा. डॉ. प्रकाश खांडगे, डॉ. वा. ल. मंजुळ, डॉ. अभय टिळक, डॉ. वर्षा तोडमल, ज्ञानेश्वर महाराज वाबळे आदी मान्यवर अभ्यासक या परिसंवादात सहभाग घेणार आहेत. प्रथमच विश्वात्मक पातळीवर संत साहित्याचा विचार महाराष्ट्राच्या भूमीत होत असून महाराष्ट्र राज्याची हीरक महोत्सवी पूर्ती तसेच हिंदुस्थानी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची पार्श्वभूमी या विश्वात्मक संत साहित्य संमेलनाला आहे.

या संमेलनाचे अध्यक्ष सुप्रसिद्ध कीर्तनकार न्यायमूर्ती ह.भ.प. डॉ. मदन महाराज गोसावी यांनी या संमेलनाविषयी आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले, माझी जिवीची आवडी पंढरपुरा नेईन गुढी अशी वारकऱयांची भावना असते. विश्वात्मक संत साहित्य संमेलनाच्या वारकऱ्यांची गुढी पंढरपूरचे चैतन्य घेऊन आता कोल्हापूरला उभारली जाणार आहे. अवस्थ वर्तमानाच्या परिप्रेक्ष्यातून वावरताना आम्हाला विश्वशांतीसाठी पूर्वासुरींची शिकवण मार्गदर्शक ठरते आहे.
‘हे विश्वचि माझे घर म्हणणारे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज किंवा ’ वसुधैव कुटुंबकम्!’ ची शिकवण देणारी आमची समृद्ध परंपरा हे आमचे सांस्कृतिक संचित आहे.

सर्वे भवन्तु सुखिन ः सर्वे सन्तु निरामय
सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित दुःख भाग्भवेत

ही विश्वशांती समृद्धीची प्रार्थना बृहदारण्यक उपनिषदे आहे. ही उपनिषद अनादी कालातील असून श्रुती-स्मृती या माध्यमातून निर्माण झालेली आहेत. प्रत्यक्ष अनुभवजन्य ज्ञानावर आधारित अशी आहेत. उपनिषदे ही संमत हिंदुस्थानी तत्त्वज्ञानाचे मूलस्रोत आहेत. समस्त मानवजातीच्या कल्याणासाठी ऋषींनी यांची निर्मिती केली आहे. त्यावर आधारित योगेश्वर श्री कृष्णाने अर्जुनाला कुरुक्षेत्रावर भगवत् गीता सांगितली. वैदिक धर्माचे हे मूलगामी तत्त्वज्ञान आणि विश्वातील इतर धर्म, संप्रदाय, तत्त्वज्ञान यातील समानतेचा धागा शोधायचा. यापाठीमागे असणारे मानवकल्याणचे सूत्र शोधून काढण्यासाठी विश्वात्मक संत साहित्य संमेलनाचे प्रयोजन केले आहे.

सामाजिक विद्वेषाला तिलांजली द्यायची असेल तर संत विचारासारखा दुसरा सकारात्मक विचार नाही. सगुण उपासना, निर्गुण उपासना, एकेश्वरवाद अनेक ईश्वरवाद, द्वैत मत, अद्वैत मत अशी विविधता हिंदू धर्मात आहे. कोल्हापूर येथे आयोजित होणाऱ्या विश्वात्मक संत साहित्य संमेलनात या सर्व मतांचा धांडोळा घेतला जाणार आहे.