आता काही दिवसांचीच प्रतीक्षा, हँकॉक ब्रिजच्या दोन लेन मेअखेर सुरू होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेल्या तब्बल चार वर्षांपासून प्रतीक्षा लागून राहिलेल्या हँकॉक ब्रिजच्या दोन लेन मेअखेरीस सुरू होणार आहेत. अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी ही माहिती दिली. या ब्रिजवरून वाहतूक सुरू झाल्यानंतर हजारो वाहनचालक, नागरिक-रहिवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

माझगाव-सँडहर्स्ट रोडदरम्यान असणारा ब्रिटिशकालीन आणि 141 वर्षे जुना हँकॉक पूल वाहतुकीसाठी धोकादायक झाल्यामुळे जानेवारी 2016 मध्ये पाडण्यात आला. पुलाचे काम सुरू झाल्यानंतर रुळाखाली पिण्याच्या पाण्याच्या जलवाहिनीसह अनेक प्रकारच्या युटिलिटीज गेल्याचे समोर आले. या ठिकाणी झोपडपट्टीही होती. त्यामुळे प्रत्यक्ष काम 2021 मध्ये सुरू करण्यात आले. मात्र या अवाढव्य पुलाचे बांधकाम गेली चार वर्षे रखडले होते. मात्र पुलाचे काम लवकरच पूर्ण होणार असल्यामुळे प्रवासी, नागरिकांची गैरसोय दूर होणार आहे. या पुलाच्या बांधकामासाठी स्थानिक आमदार यामिनी जाधव, माजी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी शिवसेनेच्या माध्यमातून पाठपुरावा केला.

दरम्यान, या ब्रिजच्या कामाला सुरुवात झाल्यानंतर चार लेन सुरू करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला. मात्र चार पैकी दोन लेनच्या शेजारी इमारती आहेत. या इमारतींतील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत चार लेन सुरू करणे शक्य नाही. परंतु माझगाव, भायखळा परिसरातील रहिवाशांची गैरसोय दूर करण्यासाठी दोन लेन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून मेअखेरपर्यंत हँकॉक पुलावरील दोन लेन सुरू करण्यात येतील, अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

सुरक्षेसाठी दर सहा महिन्यांनी पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट

प्रवासी आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी आता मुंबई शहरातील पुलांची दर सहा महिन्यांनी नियमित तपासणी आणि आवश्यकतेनुसार स्ट्रक्चरल ऑडिट केले जाणार आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात मुंबई शहर विभागातील 98 पुलांची नियमित तपासणी सुरू करण्यात आली आहे. यासाठी तज्ञ संस्थेकडून पुलाच्या मजबुतीबाबतच्या 17 पातळ्यांवर तपासणी केली जाणार आहे. यासाठी पालिका 5 कोटी 39 लाख रुपयांचा खर्च करणार आहे.

मुंबईत असे आहेत ब्रिज

मुंबईत नदी-नाल्यांवर एकूण 143 ब्रिज आहेत. यामध्ये शहरात 6, पश्चिम उपनगरात 82, पूर्व उपनगरात 55 ब्रिज आहेत.
मुंबईत 41 रोड ओव्हर ब्रिज असून 16 फ्लायओव्हर, 49 फुटओव्हर ब्रिज आणि 36 रेल्वे फुटओव्हर ब्रिज आहेत.
शिवाय वाहनांसाठी 10 आणि प्रवाशांसाठी 19 असे 29 सब वे आहेत.
एकूण 314 पालिकेच्या ब्रिजसह इतर प्राधिकरणांचे 31 मिळून 344 ब्रिज आहेत.