
महसूल विभागातील तृतीय आणि चतुर्थ श्रेणी कर्मचारी विविध प्रलंबित मागण्यासाठी आजपासून बेमुदत कामबंद संपावर गेले आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी, तहसील, प्रांत या महसूल कार्यालयात शुकशुकाट पसरला असून नागरिकांचे मात्र हाल झाले आहेत. जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत माघार नाही, असा पवित्रा संपकरी कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. अलिबाग जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कर्मचाऱ्यांनी निदर्शने केली.
महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेने बेमुदत संपाची हाक दिली होती. याआधी कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून आंदोलन केले होते. आजपासून तृतीय आणि चतुर्थ वर्गातील साडेचारशे जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन पुकारले आहे. महसूल कार्यालयात कर्मचारी उपस्थित नसल्याने विविध कामांसाठी तालुका, जिल्ह्यातून आलेल्या नागरिकांना मात्र कर्मचारी नसल्याने हात हलवत परतावे लागले.
सरळ सेवा भरती करावी, पदोन्नती प्रक्रिया, नायब तहसीलदार यांचा ग्रेड पे वाढवावा, आकृतिबंधात सुधारण्याबाबतचा दांगट अहवाल प्रसिद्ध करा, नव्याने आकृतिबंध तयार करणे, वेतन वेळेत, प्रत्येक तालुक्यात खनिकर्म निरीक्षक, पीएम किसान योजना राबवण्यासाठी पद निर्मिती, चतुर्थ श्रेणी वर्गातील कर्मचाऱ्यांना वर्ग तीनमध्ये पदोन्नती अशा एकूण 15 प्रलंबित मागण्या संघटनेने केल्या आहेत.





























































