तेव्हा मनमोहन सिंग यांना बांगडय़ा पाठवल्यात, आता आम्ही ‘त्यांना’ काय पाठवू!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशात महागाई सातत्याने वाढत आहे, पण मोदी सरकार ऐकण्याच्या मनःस्थितीत नाही. गोरगरीबांना छळणारे मुद्दे असताना मोदी सरकार आणि भाजपा सरकार हे मुद्दे बाजूला ठेवून वेगळेच मुद्दे हाताळत आहे. जात-पात-धर्म यावरच अजेंडा जात आहे. काँग्रेसच्या काळात सिलिंडर 350 झाले होते तेव्हा त्यांच्या मंत्र्यांनी आमचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांना बांगडय़ा पाठवल्या होत्या. बांगडय़ा पाठवणं कमी असण्याचं प्रतीक नाही. त्यातून त्यांनी काय सिद्ध केलं? आता 1000 रुपये सिलिंडर झाले आहे तर आता आम्ही त्यांना म्हणजे सध्याच्या पंतप्रधानांना नेमकं काय पाठवू, असा सवाल काँग्रेस आमदार प्रणीती शिंदे यांनी केंद्र सरकारला केला.

वाढत्या महागाईच्या विरोधात काँग्रेसकडून देशभरात विविध ठिकाणी आंदोलन करण्यात आले. कोल्हापूर-सोलापूरमध्ये करण्यात आलेल्या या आंदोलनामध्ये काँग्रेस आमदार प्रणीती शिंदे यांनी नरेंद्र मोदी सरकारवर निशाणा साधला. यावेळी ‘ईडी जिसकी मम्मी है, वो सरकार निकम्मी है’, असा नारा देत मोदी सरकारवर खोचक शब्दांत निशाणा साधला. तसेच ईडीकडून केल्या जाणाऱया कारवाईवरूनदेखील त्यांनी टीका केली.