
राज्यातील 198 सहकारी आणि खासगी साखर कारखान्यांनी गेल्या सहा महिन्यांत 1168 लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करत तब्बल 121 लाख मेट्रिक टन साखरेचे उत्पादन केले आहे. आतापर्यंतचे हे राज्यातील विक्रमी साखर उत्पादन असून आणखी 50 दिवस कारखाने चालतील असा अंदाज आहे.
राज्यात यंदा 15 ऑक्टोबरपासून ऊस गाळप हंगाम सुरू झाला होता. त्यानुसार 99 सहकारी तर 99 खासगी कारखान्यांनी ऊस गाळप सुरू केले होते. गेल्या सहा महिन्यांपासून सर्व कारखान्यांने पूर्ण क्षमतेने गाळप करत असल्याने आतापर्यंत 121 लाख मेट्रिक टन साखरेचे उत्पादन झाले आहे. दरम्यान आठवडाभरापासून कारखाने बंद होण्यास सुरुवात झाली असून आतापर्यंत 35 कारखान्यांनी आपले गाळप थांबवले आहे. मागील वर्षी याच काळात 190पैकी 120 कारखान्यांनी आपले ऊस गाळप बंद केले होते. राज्यात आतापर्यंत सर्वाधिक 2018-19 या वर्षातील ऊस गाळप हंगामात 107 लाख मेट्रिक टन साखरेचे उत्पादन झाले होते. यंदा 15 मेपर्यंत अनेक कारखाने चालणार असल्याने साखरेचे एकूण उत्पादन 130 लाख मेट्रिक टनाच्या पुढे जाईल, असा अंदाज आहे.



























































