
केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळेच दिवसेंदिवस महागाई वाढत चालली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे देशाच्या अर्थव्यवस्थेवरील नियंत्रण सुटत आहे. जनतेला त्याचे चटके बसत आहेत. अर्थव्यवस्था सुधारण्याचा योग्य प्रयत्न होणे गरजेचे आहे; अन्यथा आपल्या देशाची अवस्था श्रीलंकेसारखी होण्यास वेळ लागणार नाही, अशी भीती काँग्रेसचे नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज पत्रकार परिषदेत व्यक्त केली.
दरम्यान, विरोधात बोलणाऱयांना शरण आणण्यासाठीच ईडीचा ब्लॅकमेलिंगसारखा वापर केला जात आहे. भाजपकडून चौकशी यंत्रणांचा गैरवापर करून कितीही प्रयत्न केले तरी महाविकास आघाडी सरकारला काही होणार नाही. यापुढे सरकार आणखी जोमाने काम करेल, असा विश्वासही चव्हाण यांनी व्यक्त केला.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, कोविडच्या आधी देशाचा विकासदर 4.2 एवढा असल्याचे सांगितले जाते. पण तो मायनस होता. आता महागाई प्रचंड वाढल्याने अर्थव्यवस्थेला घरघर लागली आहे. देशातील महागाई वाढण्यास केंद्र सरकारची धोरणे आणि त्यांनी लावलेली एक्साईज ड्युटी कारणीभूत आहे. गेल्या सात वर्षांत मोदी सरकारने केवळ पेट्रोलियम पदार्थापासून कररूपाने तब्बल 24 लाख कोटी रुपयांचा महसूल थेट जनतेच्या खिशातून वसूल केल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. केंद्रातील सचिवांच्या झालेल्या बैठकीत, ‘मोदी सरकारने आपल्या धोरणांत बदल न केल्यास देशाची अवस्था श्रीलंकेसारखी होईल’, असा थेट इशाराच सचिवांनी दिल्याकडे पृथ्वीराज चव्हाण यांनी लक्ष वेधले.
पेट्रोल-डिझेलच्या वाढलेल्या दरावरून मोदी सरकार विरोधात जनतेत रोष आहे. त्याकडे दुर्लक्ष व्हावे, यासाठीच हिंदुत्वाचा मुद्दा आणला जात आहे. मात्र, कोल्हापूरची स्वाभिमानी जनता पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव करेल, असा विश्वास चव्हाण यांनी व्यक्त केला.
विरोधात बोलणाऱयांना शरण आणण्यासाठीच ‘ईडी’चा वापर
सध्या कधी नव्हे इतका सरकारी यंत्रणांचा गैरवापर करून राज्यातील नेत्यांना ब्लॅकमेलिंग केले जात आहे. विरोधात बोलणाऱयांना शरण आणण्यासाठीच मोदी सरकार ईडीचा वापर करत असल्याचा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. जे चुकीचे आहे त्यावर कारवाई करा, सुडाच्या भावनेने नको, असे चव्हाण म्हणाले.
























































