
कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून आज वचननामा जाहीर करण्यात आला. विशेष म्हणजे राज्यात आपले सरकार नसले तरी केंद्र सरकारच्या योजनेतून पाइपलाइनद्वारे घरोघरी गॅस पुरवठा, इलेक्ट्रिक बसेस, तरुणाईच्या टॅलेंटसाठी स्वतंत्रपणे यंग कम्युनिटी, शेतमालाला उठाव देण्यासाठी कार्गो हब यांसारख्या संकल्पना राबविण्याची घोषणा करण्यात आली.
यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी खासदार धनंजय महाडिक, चित्रा वाघ, हर्षवर्धन पाटील, माधव भंडारी, केशव उपाध्ये, उमेदवार सत्यजित कदम, समरजितसिंह घाटगे, राहुल चिकोडे, शौमिका महाडिक आदी यावेळी उपस्थित होते.
चंद्रकांत पाटील यांनी केंद्राच्या विविध योजना कोल्हापुरात आणून शहराचा विकास करू, अशी ग्वाही देत, विमानतळ विस्तारीकरण, रेल्वे सुविधांसह अन्य विकासकामांच्या पाठपुराव्यासह सत्यजित कदम यांच्यासाठी दिल्लीत स्वतंत्र पीए असेल. कोल्हापूर शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून भाजप नियोजनबद्धरीत्या कामकाज करेल, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
दरम्यान, हद्दवाढीसाठी आपण पाच वर्षांत संबंधित गावांशी समन्वय साधण्याचा प्रयत्न केला. आता हद्दवाढपण नाही आणि प्राधिकरणही नाही. पुण्यात 50 गावे हद्दवाढीत समाविष्ट होतात, तशी हिम्मत कोल्हापुरात दाखवणार का, असा सवाल त्यांनी केला.




























































