स्मृतिगंध – देवपण नावा आले…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> चंद्रकांत बढे

राजा बढे अर्थात राजाराम नीलकंठ बढे हे ‘जय जय महाराष्ट्र माझा’ गीत लिहून मराठी माणसाच्या हृदयात कायमचं स्थान मिळवून बसले आहेत. 7 एप्रिल 1977 ला राजाभाऊ अचानक हे जग सोडून गेले खरे, पण त्यांच्या कविता, गीते आणि लेखन आजही तितकेच ताजे, तरुण आहे.

राजाभाऊंचा जन्म 1 फेब्रुवारी 1912 या दिवशी नागपूरला झाला. साहित्य, संगीत या आवडी त्यांच्या घरात बहुतेक सर्वांना होत्या. शिक्षण पूर्ण होत नाही तोच घरची जबाबदारी आली आणि नागपूरकडची पत्रकारितेतली उमेदवारी सोडून राजाभाऊ मुंबईल्या चित्रपटसृष्टीकडे वळले. प्रकाश पिक्चर्समधील नोकरी त्यांना स्थिरस्थावर करणारी ठरली. नाटक, चित्रपट क्षेत्रात काम करत असूनही त्यांना खरी प्रसिद्धी मिळाली ती प्रकाश पिक्चर्सच्याच ‘रामराज्य’च्या गीत लेखनाने. इथून मग राजाभाऊंनी मागे वळून पाहिलं नाही.

मराठीत राजाभाऊ जास्त प्रसिद्धी पावले ते भावगीतकार म्हणून. ज्योत्स्नाबाईंनी ऐन उमेदीच्या काळात गायलेले आणि आजही लोकप्रिय असलेलं ‘माझिया माहेरा जा’ हे भावगीत, तसंच कुमार गंधर्वजींनी गायलेलं ‘प्रेम केलं काय हा केला गुन्हा ’ असो. लता मंगेशकर यांची भावगीताची पहिली ध्वनिमुद्रिका निघाली ती ‘हसतेस अशी का मनी’ आणि आशा भोसले यांनी गायलेलं ‘चांदणे शिंपीत जा’ की, जे हृदयनाथ यांची पहिली रचना, ही भावगीते राजाभाऊंचीच.

राजाभाऊंचे काव्य माझिया माहेरा जा,  हसले मनी चांदणे, क्रांतिमाला, रसलीना, शृंगार श्रीरंग, छंदमेघ, द्राक्षयणी, राजबंदिनी, मखमल, मंदिका अशा संग्रहांतून प्रसिद्ध झालं आहे. त्याचप्रमाणे ‘किती रे दिन गेले’सारखी कादंबरी आणि स्वप्नगंधा, चतुर किती बायका, ही रात्र सवत बाई व पेचप्रसंगसारखी नाटकं आणि संगीतिका असं विपुल लेखन त्यांनी केलं आहे. पुढील काळात काही वर्षे राजाभाऊ मुंबई आकाशवाणीवर सुगम संगीताचे निर्माते होते त्या काळात त्यांनी शेकडो भावगीते आणि सांगितिका लिहिल्या, पण सरकारी प्रचारकी त्यांना कधी करावीशी वाटली नाही. गजानन वाटवे आणि राजाभाऊ यांचा स्नेह फार दाट होता. राजाभाऊंनी रचलेले आणि वाटवेंनी गायलेले ‘हसताच नार ती अनार मनी फुलले’ या ध्वनिमुद्रिकेने अनेकांना भुरळ घातली होती. वाटवे एक किस्सा सांगत की, एचएमव्हीमधून काम संपवून दोघे दादरला जायला बसमध्ये बसले आणि त्यांना बातमी कळली की, एडमंड हिलरी व शेर्पा तेनसिंग यांनी एव्हरेस्ट सर केलं. वाटव्यांनी राजाभाऊंना लगेच यावर गीत लिहायला सांगितलं, तर राजाभाऊंनी तत्काळ हातीच्या बसच्या तिकिटावर लिहायला सुरुवात केली, ‘जय जय भारत भाग्य शुभंकर…’ घरी जाताच गाणं तयार होतं आणि वाटव्यांनीही लगेच चाल लावली.

स्वातंत्र्यवीर सावरकर हे राजाभाऊंचे दैवत. तात्यांनासुद्धा राजाभाऊ यांचे कौतुक असे. म्हणूनच ‘रामराज्य’ची गीते राजा बढे यांच्याचकडून लिहून घ्या असा तात्यांनी त्या चित्रपटाच्या निर्मात्याला सल्ला दिला होता. राजाभाऊंचा मित्रपरिवार घनदाट होता. आचार्य अत्रे, पु. भा. भावे, प्रबोधनकार ठाकरे, पु. ल. देशपांडे, द. ग. गोडसे, शाहीर साबळे… अशी त्या पिढीतील बहुतेक सर्व प्रतिभावान लोकांना राजाभाऊंनी आपल्या लाघवी नागपुरी बोलीने आपलं केलं होतं. दादरच्या किशोरी निवास इमारतीमधलं बढेंचं घर म्हणजे एक ‘साहित्य सहवास’च होता. अटलबिहारी वाजपेयी त्यांचे आणखी एक स्नेही. 1977 साली जनता सरकार निवडून आलं आणि अटलजी मंत्री झाले. तेव्हा मुद्दाम अटलजी यांनी आपल्या या मित्राला दिल्लीतल्या शपथविधी सोहळ्याला बोलावून घेतलं, पण दुर्दैव असं की, 7 एप्रिल रोजी राजाभाऊ यांचं दिल्लीतच अकाली निधन झालं. सर्व स्नेही बांधवांना चांदणे हरवल्याचा तो धक्का होता.

मी तर त्यांचा धाकटा भाऊ. माझ्या डोक्यावरची भाईंची सावली अंतरली. आज त्यांना जाऊन 45 वर्षे उलटून गेलीत. आमच्या दादरच्या घरी मी त्यांच्या स्मृतींना उजाळा देतो तेव्हा वाटतं, तुम्ही गेला आणिक तुमच्या देवपण नावा आले…