
ख्यातनाम शास्त्रीय संगीत गायक जितेंद्र अभिषेकी, सुरेश हळदणकर आणि सीआर व्यास यांच्या स्मरणार्थ दरवर्षी ‘स्वरांजली’ महोत्सवाचे आयोजन केले जाते. हा महोत्सव यंदा 16 आणि 17 एप्रिल रोजी वरळी येथील नेहरू सेंटरमध्ये होणार आहे. ‘स्वरांजली’ महोत्सवामध्ये आघाडीचे कलाकार सहभागी होणार असून यात पंडित उल्हास कशाळकर, उस्ताद शहीद परवेझ, पंडित जयतीर्थ मेवुंदी, आनंद भाटे, पंडित राकेश चौरसिया, विद्वान यू राजेश, पंडित आदित्य कल्याणपूर, स्वामिनाथन सेल्वगणेश व्ही यांचा समावेश आहे.
‘स्वरांजली’ची सुरुवात पंडित उल्हास कशाळकर करणार आहेत. पहिल्या दिवसाची सांगता उस्ताद शाहीद परवेझ यांच्या सितारवादनाने होणार आहे. महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात पंडित जयतीर्थ मेवुंदी यांच्या गायनाने होणार आहे. मेवुंदी यांच्यानंतर पंडित आनंद भाटे शास्त्रीय संगीत सादर करणार आहेत. या दोन दिवसीय महोत्सवाची सांगता पंडित राकेश चौरसिया, विद्वान यू राजेश, विद्वान पत्री सतीश कुमार आणि आदित्य कल्याणपूर यांच्या जुगलबंदीने होणार आहे.

























































