महागडय़ा कॉर्पोरेट रुग्णालयांमुळे गैरसमज वाढून डॉक्टरांवर हल्ले; ‘आयएमए’चे डॉ. मंगेश पाटे यांचे मत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

खासगी कॉर्पोरेट रुग्णालयांमध्ये होणाऱया अवाढव्य खर्चामुळे रुग्णांचा डॉक्टरांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. त्यातून निर्माण होणाऱया गैरसमजातून डॉक्टर्स आणि रुग्णालयांवर हल्ले होण्याच्या घटना वाढल्या आहेत, असे मत इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) महाराष्ट्र शाखेचे सचिव डॉ. मंगेश पाटे यांनी व्यक्त केले.

पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथे स्त्र्ााrरोगतज्ञ डॉ. नीलेश म्हस्के यांच्यावर एका रुग्णाच्या नातेवाईकांनी हल्ला केल्याची घटना घडली होती. एका महिलेने त्यांच्या रुग्णालयात जुळय़ा मुलांना जन्म दिला होता. त्यानंतर तिची प्रकृती खालावल्याने तिचा मृत्यू झाला होता. त्याक्षणी नातेवाईकांनी काहीच आक्षेप घेतला नव्हता; परंतु त्या महिलेच्या दशक्रियेसाठी आलेल्या माहेरच्या मंडळींनी डॉ. म्हस्के यांच्या रुग्णालयात घुसून तिथे उपस्थित डॉ. शेळके यांच्यावर हल्ला केला होता. डॉ. पाटे यांनी नगर येथे त्याचा निषेध नोंदवला. त्याप्रसंगी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी डॉक्टरांवरील हल्ल्यांमागची कारणे सांगितली. या हल्ल्यातील आरोपींना अटक न झाल्यास मंगळवारनंतर राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशाराही ‘आयएए’ने दिला आहे.

डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातील नाते पूर्वी सौहार्दपूर्ण होते. आता कॉर्पोरेट रुग्णालयांची संस्कृती फोफावली. ती रुग्णालये चालवण्यासाठी खूप खर्च येत असल्याने तेथील उपचारही महाग आहेत. त्यामुळे रुग्णांच्या मनात चीड निर्माण होते, असे डॉ. पाटे म्हणाले. स्वार्थासाठी डॉक्टरांविरुद्ध भडकावण्याचे कामही केले जाते. त्याचा फटका गावखेडय़ातील डॉक्टरांनाही बसत आहे असे डॉ. पाटे म्हणाले. देशातील 90 टक्के आरोग्यसेवा ही ग्रामीण भागांतील छोटी रुग्णालये देत आहेत, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.