वाई शहरात आढळले 71 ‘हेरिटेज ट्री’, नगरपालिकेच्या वृक्षगणनेत 32 हजारांवर झाडांची नोंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वाई नगरपरिषदेने ‘माझी वसुंधरा अभियान–2’मध्ये सहभाग घेतला असून, त्याअंतर्गत वाई शहरातील वृक्षांची गणना पूर्ण करण्यात आली आहे. त्यानुसार वाई शहरात 32 हजार 117 वृक्षांची नोंद करण्यात आली असून, त्यामध्ये 71 ‘हेरिटेज ट्री’ आहेत.

वाई शहरात एकूण 127 प्रकारचे वृक्ष आढळून आले आहेत. त्यापैकी करंज या वृक्षाची संख्या सर्वाधिक 4 हजार 483 (27 टक्के) असून, त्याखालोखाल आंबा, नारळ, बाभूळ आणि कडुलिंब या वृक्षांची संख्या जास्त आहे. ही गणना प्रभागनिहाय करण्यात आली असून, प्रभाग क्रमांक 9 मध्ये सर्वाधिक 7 हजार 138 वृक्ष आढळून आले आहेत. वृक्षगणनेसोबतच शहरातील वृक्षांचे जीओ टॅगिंगदेखील करण्यात आले आहे.

जैवविविधता अधिनियम 2002 नुसार वाई नगरपरिषदेमार्फत लोक जैवविविधता नोंदवही तयार करण्यात आली आहे. त्यानुसार वाई शहरातील विविध प्रकारच्या वनस्पती, मासे, प्राणी, कीटक यांच्या विविध प्रजातींची शास्त्रीय नावे, प्रकार, स्थानिक वापर यांसह इतर अनुषंगिक माहिती छायाचित्रांसह संकलित करण्यात आली आहे. लोक जैवविविधता नोंदवहीमध्ये वाई शहरातील लोकजीवन, भूमीरचना तसेच पाण्याच्या स्रोतांच्या विविध प्रकारांची माहितीदेखील संकलित करण्यात आली आहे. शहरातील विविध भागांत आढळणाऱ्या प्राणी तसेच वनस्पतींच्या स्थानिक प्रजातींचीदेखील नोंद जैवविविधता नोंदवहीमध्ये करण्यात आली आहे. शहरातील बाहेरील प्रदेशातून आलेल्या इनवेजिव्ह स्पिसिजची नोंददेखील लोक जैवविविधता नोंदवहीत केली आहे.

हेरिटेज वृक्षांजी ‘जीओ टॅगिंग’

दरम्यान, वाई शहरातील ‘हेरिटेज ट्री’ म्हणजेच 50 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या वृक्षांची गणना करण्यात आली आहे. त्यानुसार शहरातील विविध भागांत 71 हेरिटेज वृक्षांची नोंद झाली आहे. सोनगिरवाडी परिसरामध्ये सर्वाधिक हेरिटेज वृक्षांची नोंदणी झाली असून, सर्व हेरिटेज वृक्षांची जीओ टॅगिंग छायाचित्रासह माहिती संकलित करण्यात आली आहे.