
रेकॉर्डवरील संशयित आरोपी गौरव सुरेश बनसोडे (वय 21, रा. मलकापूर, ता. कराड) याला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने देशी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतूस बाळगल्याप्रकरणी अटक केली. त्याच्याकडून 65 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
कराडमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये भाजीमंडईत गुन्हेगारी टोळय़ांमध्ये धुसफूस वाढली आहे. यामुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस लक्ष ठेवून होते. त्यातच एकजण पिस्तूल घेऊन भाजीमंडई परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावला. त्यावेळी एक संशयित फिरत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी त्याला पकडले. यावेळी संशयिताने तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्याला पकडले.
संशयिताची अंगझडती घेतली असता, त्याच्याकडे देशी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतूस सापडले. पोलिसांनी ते ताब्यात घेऊन त्याबाबत विचारणा केली असता, संशयित निरुत्तर झाला. पोलिसांनी त्याला कराड पोलीस ठाण्यात नेऊन त्याच्यावर आर्म्स ऍक्टचा गुन्हा दाखल केला. संशयिताची अधिक माहिती घेतली असता, तो रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, त्याच्याविरुद्ध आणखी गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.
जिल्हा पोलीसप्रमुख अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे, पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, फौजदार मदन फाळके, पोलीस हवालदार उत्तम दबडे, तानाजी माने, संजय शिर्के, विजय कांबळे, संतोष पवार, शरद बेबले, साबीर मुल्ला, प्रवीण फडतरे, नीलेश काटकर, अजित कर्णे, रोहित निकम यांनी कारवाईत सहभाग घेतला.





























































