
बुधवारी पुण्याच्या एमसीए स्टेडियमवरील महत्त्वपूर्ण आयपीएल लढतीतही माजी विजेत्या मुंबई इंडियन्सला पंजाब किंग्सकडून 12 धावांनी पराभवाची चव चाखावी लागली. सलग पाचव्या पराभवामुळे मुंबई संघाला स्पर्धेतील आपले आव्हान टिकवून ठेवण्यासाठी जोरदार संघर्ष करण्याची वेळ आली आहे. या अतिशय खराब कामगिरीमुळे पाच वेळा आयपीएल चषक पटकावणारा मुंबई संघ आता यंदा प्ले ऑफ फेरीत तरी पोचणार का, याबाबत चक्क मुंबईचे चाहतेच संभ्रमात आहेत. मुंबईचा संघ सध्या गुणतालिकेत शून्य गुणांसह शेवटच्या म्हणजे दहाव्या स्थानावर आहे.
आता मुंबईच्या प्ले ऑफबद्दलच्या संधीबद्दल बोलायचे झाले तर मुंबईला चमत्कारच करावा लागेल. यापूर्वीही मुंबईने अशा पद्धतीचे चमत्कार करत ‘प्ले ऑफ’मध्ये धडक मारल्याने चाहत्यांना रोहितच्या संघाकडून अपेक्षा कायम आहेत.
आठ विजय आवश्यक
आता हीच आकडेमोड लक्षात घेतल्यास आता मुंबईला त्यांच्या उरलेल्या नऊ सामन्यांपैकी आठ सामन्यांमध्ये विजय मिळवावा लागेल. मात्र असे झाले नाही तर मुंबईला ‘प्ले ऑफ’च्या आशा संपल्यात जमा होतील. मात्र मुंबईसाठी आणि संघाच्या चाहत्यांसाठी एकमेव चांगली गोष्ट म्हणजे यापूर्वीही मुंबईचा संघ अशा परिस्थितीमधून बाहेर येत थेट जेतेपदापर्यंत पोहचला होता.
आधीही केला आहे पराक्रम
याआधी 2015 मध्ये मुंबईने त्यांच्या पहिल्या सहा सामन्यांपैकी पाच सामने गमावले होते. त्यानंतर पुढील आठ सामन्यांपैकी सात सामने जिंकत त्यांनी ‘प्ले ऑफ’मध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर थेट जेतेपदाला गवसणी घातली होती. मात्र ते पर्व आठ संघांचे होते आणि हे पर्व 10 संघांमध्ये खेळवले जात आहे. त्यामुळेच आता नऊपैकी सात सामने जिंकून मुंबईला अव्वल चारमध्ये स्थान मिळवणे कठीण असेल हे मात्र निश्चित.

























































