खान्देश एक्स्प्रेसमध्ये सापडले चार दिवसांचे बाळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

खान्देश एक्स्प्रेसच्या एका डब्यातील शौचालयात चार दिवसांचे बाळ आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्या बाळावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी बोरिवली रेल्वे पोलिसांनी अज्ञात महिलेविरोधात गुन्हा नोंद केला आहे.

तक्रारदार हे विलेपार्ले येथे राहत असून ते कुटुंबीयांसोबत नंदुरबार येथे गेले होते. मंगळवारी त्याने बोरिवलीला येण्यासाठी खान्देश एक्स्प्रेस पकडली. बुधवारी पहाटे खान्देश एक्स्प्रेस बोरिवली स्थानकात येत होती. तेव्हा तक्रारदार हे एका डब्यातील शौचालयात गेले होते. तेव्हा त्यांना चादरीत गुंडाळलेले चार दिवसांचे बाळ दिसले. एक्स्प्रेस बोरिवली स्थानकात आल्यावर तक्रारदार याने याची माहिती स्टेशन मास्टरला दिली.

स्टेशन मास्टर त्या डब्याकडे जात असतानाच एक्स्प्रेस वांद्रेच्या दिशेने गेली. त्यानंतर स्टेशन मास्टरने याची माहिती वांद्रे रेल्वे पोलिसांना सांगितली. या माहितीनंतर वांद्रे रेल्वे पोलीस एका डब्यात गेले. त्या डब्यातील शौचालयातून चार दिवसांच्या बाळाला ताब्यात घेऊन त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. त्या बाळाची प्रकृती ठीक आहे. बाळाचा त्याग केल्याप्रकरणी वांद्रे रेल्वे पोलिसांनी अज्ञात महिलेविरोधात गुन्हा नोंद करून तो पुढील तपासासाठी बोरिवली रेल्वे पोलिसांना वर्ग केला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून त्या महिलेचा शोध घेण्यात येत असल्याचे वरिष्ठ निरीक्षक अनिल कदम यांनी सांगितले.