
>> डॉ. श्री. दे. नाईक
माणसाच्या आयुष्याचा जैविक प्रवास अद्भुतरम्य आहे. बाहेरच्या जगात पहिला श्वास घेऊन जन्मवेळेची नोंद होण्याआधीच नऊ महिने मातेच्या गर्भात जिवाचा ‘जन्म’ झालेला असतो. त्या श्वासपूर्व जन्मापासून ते जन्मल्यानंतर अखेरचा श्वास घेईपर्यंतचा काळ म्हणजे आपला जीवनपट. तो कोणाचा किती असेल याचं काही निश्चित गणित नाही, पण आपली प्रत्येक सजीव पेशी आरंभापासूनच जीवनाचा अंत दूर ढकलण्याचा आटोकाट प्रयत्न करत असते. हा जीवन प्रवास आपल्या नकळतच घडत असला तरी त्यामागे निसर्गाची विलक्षण गुंतागुंतीची अशी चपखल योजना आहे. अनेक घटक वेळोवेळी अचूकतेने कार्यान्वित होत होत आपण जगत असतो. या थक्क करणाऱ्या गोष्टींचा आढावा घेणारे जैव-संकेत’ हे सदर…
वैद्यकशास्त्राने लावलेल्या अपूर्व शोधांमुळे आणि उपचारांमुळे आपलं शरीरविज्ञान आपल्याला समजतं. हा व्यवसाय करणाऱ्यांना त्यातील क्लिष्टपणा बारकाईने समजून घ्यावाच लागतो. तो सर्वसामान्यांचं कुतुहल जागृत करणाऱया आणि ते शमविणाऱ्या ‘जैविक’ गोष्टींचा विचार साध्या-सोप्या भाषेत मांडला तरी त्यातील विस्मयकारी गोष्टी जाणवू लागतील. आपलं ‘जगणं’ म्हणजे काय ते उमगेल. स्त्री-पुरुष बीजमिलनातून गर्भधारणा झाली की, हळूहळू विविध अवयव आकार घेऊ लागतात. गर्भाच्या 21 ते 25 व्या दिवशीच हृदयाची टिकटिक सुरू होते. आता ती पुढे आयुष्यभर अथकपणे चालणार असते, त्याचाच हा संकेत असतो. पहिल्या चार आठवडय़ांत चार मिलिमीटर आकाराचा असलेला गर्भ आठव्याच आठवडय़ात 40 मिलिमीटर, सोळाव्या आठवडय़ापर्यंत 140 मि.मी. होतो. विसाव्या आठवडय़ात त्याचा आकार 190 मि.मी. होत असतानाच श्रवणक्रिया, प्रकाशाचे आकलन (दृष्टी) आणि इतर संवेदना जाणवू लागतात. हे सर्व गर्भाच्या तिसऱया महिन्यापर्यंत घडतं. पुढे सातव्या महिन्यात गर्भाचं वजन किलोभर (दोन पाउंड) होऊन आकार 15 इंचांपर्यंत जातो. असे करत करत पूर्ण वाढीचा गर्भ, नवजात बालक म्हणून सुमारे 280 दिवस किंवा 40 आठवडे अथवा नऊ महिन्यांनी मातेपासून विलग व्हायची घाई करू लागतो आणि ‘तो’ किंवा ‘ती’ जन्माला येते!
दिसामासी वाढणारं मूल बाल्यावस्था, पौगंडावस्था, तारुण्य, प्रौढपणा आणि वृद्धत्व अशी जैविक ‘कात’ टाकत जीवनक्रम पूर्णत्वाकडे जाईपर्यंत एक व्यक्ती म्हणून वावरते. त्यांची शरीररचना, रंगरूप, बुद्धिमत्ता याचा नैसर्गिक वारसा आणि जन्मानंतरचे संस्कार यातून विकास होऊ लागतो. बालपणातील खटय़ाळपणा, तारुण्यातील संप्रेरक (होर्मोन्स) शक्तीने घडविलेले शारीरिक बदल, उत्साह, विजिगिषू वृत्ती या सगळय़ा गोष्टींचा आविष्कार होतो. शेवटी वृद्धत्व आणि एकेका अवयवाची शक्तिक्षीणता यासुद्धा निसर्गक्रमातील जैव-संकेतांमधल्या अनिवार्य गोष्टी असतात. कोणताही सजीव स्वतःला सतत जगवण्याचा सतत प्रयत्न करतो. ती त्याची नैसर्गिक उर्मीच असते. त्यात अपयश येतंय असं वाटलं की आजार होतात. त्यावर मात करण्यासाठी वैद्यकशास्त्र तत्पर असतं. अनेक आजारांवर मात करणाऱ्या उपचारांनी आयुष्मान वाढवता येतं हे अनुभवाने सिद्ध झालेली गोष्ट आहे. ‘या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे’ असं जीवन आपल्याला केवळ जैविक योगायोगाने लाभतं. ते किती अमूल्य आहे याचा विचार केला आणि जैवसंकेतांमागचं इंगित (रहस्य) जाणून घेतलं तर जीवन अधिक संपन्न आणि आनंददायी होऊ शकतं.





























































