रंग बदलून हिंदुत्व येत नाही, ते रक्तात असले पाहिजे; आदित्य ठाकरे यांचा मनसेला टोला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हनुमान जयंती आम्ही पूर्वीपासून साजरी करत आलो आहोत. मात्र सध्या एक-दोन नवीन पक्ष 4-5 वर्षांनी काहीही करायला लागले आहेत. रंग बदलून हिंदुत्व येत नाही, ते रक्तात असले पाहिजे, असा टोला शिवसेना नेते आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी मनसेला लगावला. भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयात सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे लोकार्पण आदित्य ठाकरे यांच्या हस्ते आज झाले. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.

मुंबई महापालिका मुंबईकरांना देत उद्याने, प्राणिसंग्रहालये यांसारख्या विरंगुळय़ाच्या विविध ठिकाणी अधिकाधिक सोयीसुविधा उपलब्ध करून देत आहे. वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयातील प्राण्यांच्या आधुनिक प्रदर्शन कक्षांचे, ‘बायोम’ थीमवर आधारित बगीचाचे आणि सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे लोकार्पण आज आदित्य ठाकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार यामिनी जाधव, माजी महापौर किशोरी पेडणेकर, शिवसेना उपनेते यशवंत जाधव, सिनेट सदस्य निखिल जाधव, अतिरिक्त आयुक्त संजीवकुमार, प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी आदी उपस्थित होते.

अयोध्येत दर्शनासाठी जाणार!

अयोध्येतले श्री रामाचे मंदिर खूप मेहनत घेऊन बनवले आहे. दर्शनासाठी कधी जायचे याबाबत संजय राऊत आणि माझी चर्चा सुरू आहे. लवकरच दर्शनासाठी अयोध्येत जाणार आहोत, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

7 लाख लिटर पाणी क्षमतेचा प्रकल्प

वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान-प्राणिसंग्रहालयातील विविध झाडे, प्राणी-पक्षी यांच्याकरिता पिण्यासाठी, सिंचनासाठी मोठय़ा प्रमाणावर पाणी लागते. दररोज सुमारे 3 ते 5 लाख लिटर पाण्याची आवश्यकता येथे असल्याने महानगरपालिकेच्या पाणीपुरवठय़ावर अवलंबून न राहता स्वबळावर सर्व सुविधा चालविण्याच्या दृष्टीने सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात आला आहे. या प्रकल्पाअंतर्गत दररोज सुमारे 5 लाख लिटर प्रक्रिया केलेले पाणी मिळणार असून सुमारे 7 लाख लिटर पाण्याची क्षमता असलेल्या अंडरग्राऊंड टाकीमध्ये हे पाणी साठवण्यात येईल. शुद्धीकरण केलेले हे पाणी प्राणिसंग्रहालय परिसरातील जलसिंचन प्रणालीशी जोडून संपूर्ण परिसराला पिण्याव्यतिरिक्त पाणीपुरवठा केला जाईल.