
दिवसेंदिवस पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडत आहेत. पेट्रोलने गाठलेल्या विक्रमी दरामुळे वाहनधारकांच्या खिशाला चांगलीच कात्री लागत आहे. यावर उपाय म्हणून शक्य होईल ते आता पायी चालत आहेत. अनेकजण पर्यायी प्रवासमार्गाचा अवलंब करीत आहेत. सांगली जिल्ह्यातील वांगी गावातील एका 14 वर्षांच्या सुशांत मेटकरी याने असाच पर्याय शोधताना एक भन्नाट प्रयोग करीत इलेक्ट्रिक सायकल तयार केली आहे. विशेष म्हणजे, त्याने ही सायकल खास आपल्या वडिलांसाठी बनविली आहे. पेट्रोल महागल्याने कामावर पायी जाणाऱया वडिलांना त्याने ही अनोखी भेट दिली आहे.
पेट्रोलचे वाढते दर पाहता, ऐन उन्हाळ्यात पायी प्रवास करणाऱया आपल्या वडिलांना कामावर सहजरीत्या जाता यावे आणि वेळेची बचत व्हावी, यासाठी सुशांतने ही इलेक्ट्रिक सायकल तयार केली आहे. ही सायकल दोन तास चार्ज केली की, 50 किलोमीटरचा पल्ला गाठत असल्याची माहिती सुशांतने दिली.
घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत बेताची असताना आणि त्याला इतक्या लहान वयात हाय शुगरचा त्रास असतानाही केवळ आपल्या दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर त्याने ही इलेक्ट्रिक सायकल तयार केली.
सुशांत सांगतो, ‘दिवसेंदिवस पेट्रोलची होणारी दरवाढ यामुळे काटकसर म्हणून वडिलांनी दुचाकीचा वापर करणे बंद केले. त्यामुळे ते कामावर आणि जेथे शक्य होईल, तेथे पायी जाणेच पसंत करतात. त्यामुळे वेळेचा मोठा अपव्यय होतोच आणि मोठे शारीरिक कष्ट करावे लागतात. त्यात आता ऐन उन्हाळ्यात वडिलांना पायी प्रवास करताना पाहून, त्यांचे हे कष्ट कमी व्हावेत आणि पेट्रोल दरवाढीवर उपाय म्हणून डोक्यात इलेक्ट्रिक सायकल तयार करण्याची कल्पना आली.’
दत्तात्रय मेटकरी यांना आपल्या मुलाच्या हुशारीमुळे पॅडल न मारता फक्त रेस वाढविली की, पळणारी इलेक्ट्रिक सायकल मिळाली आहे. सुशांतच्या या हुशारीवर त्याचे आई -वडील, मामा व नातेवाईक प्रचंड खूश आहेतच, पण पंचक्रोशीतही त्याच्या या कल्पकतेचे मोठे कौतुक होत आहे.
अशी बनविली सायकल
ई-सायकल तयार करण्यासाठी सुशांतने आपल्या जुन्या सायकलला 12 व्होल्टच्या दोन बॅटरी जोडल्या. आता ही सायकल दोन तास चार्ज केली की, 50 किलोमीटर पॅडल न मारत प्रवास करता येत असल्याचे सुशांत सांगतो.



























































