शिरीषायन – चला डॉक्टर पुलं बनने

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> शिरीष कणेकर

मी अंधेरीला एका मोठय़ा डॉक्टरकडे गेलो होतो. (एवढय़ावरून नाव कसं ओळखाल?) मी कोळंबीच्या खिचडीची रेसिपी विचारायला आलोय यासम त्यानं स्वतःची समजूत करून घेतली असावी. कारण गेल्या गेल्या तो मला म्हणाला, ‘‘खाताना आपण खातो, पण नंतर त्रास होतो हो.’’

‘‘काय?’’ मी हबकून विचारले. कारण मी येताना बायकोच्या शिव्या खाऊन आलो होतो. आमच्याकडे ती वडिलोपार्जित पद्धतच आहे. बायकोनं शिव्यांचा भडीमार सुरू केला की, पायात चपला घालून बाहेर पडायचं. परत येईपर्यंत भडीमार शमला असेल तर तो चपलांचा पायगुण समजायचा, पण हे सगळं त्या डॉक्टरला कसं कळलं असेल? त्याच्याकडेही हीच प्रथा असू शकेल काय? मी वाकून टेबलाखालून त्याचे पाय पाहिले. त्यानं चक्क बूट घातले होते. ही महत्त्वाची खूण होती. बूट घालायला वेळ लागतो. म्हणजे शिव्यांचा काळ वाढला. मोठय़ा डॉक्टरवर अजून चप्पल घालायची वेळ आली नव्हती तर. एक माणूस तरी ‘बा. ब.’ (बायकोचा बळी) नव्हता.

डॉक्टरनं करपट ढेकर दिला. खिचडीतील कोळंबी ढेकर रूपानं आपलं अस्तित्व दाखवून देत होती. ‘इनो घ्या.’ (व शक्यतो कोळणीला घेऊ नका.) मी माझा तज्ञ सल्ला दिला. मी डॉक्टरचा वैद्यकीय सल्ला घ्यायला आलो होतो हे विसरूनच गेलो होतो. माझ्या एका मित्रानं तर माशांना कोळणीची नावं दिल्येयत. तो रावस म्हणाला की त्यानं कोणाकडून फिश घेतलंय आम्ही ओळखतो. सुरमई म्हणजे कोण, पापलेट म्हणजे कोण, बांगडा म्हणजे कोण, बोंबील म्हणजे कोण, मांदेली म्हणजे कोण, आम्ही तक्ताच तयार केलाय. म्हणून कोणी आम्हाला माशातलं तज्ञ म्हणालं की आमचं रहस्य यानं ओळखलं की काय या शंकेनं आम्ही चपापतो.

डॉक्टरनं माझी केस-हिस्टरी घेतली नाही. मला तपासलं तर नाहीच नाही. तो केवळ कोळणींचा स्पेशॅलिस्ट तर नसेल? मी बोंबलासारखा दिसतो म्हणून त्याच्या रिसेप्शनिस्टनं मला आत घेतलं असावं. नशीब तिनं माझं मुंडकं छाटलं नाही.
मी कल्पनेतदेखील विचार करू शकलो नसतो अशा भलत्याच विषयाला त्यानं एकाएकी हात घातला. तो मला म्हणाला, ‘‘मी आरामात पु. ल. देशपांडेंपेक्षा चांगलं लिहू शकतो.’’
‘‘आँ?’’ मी नर्सनं चिमटा काढल्यागत किंचाळलो.
‘‘पु. ल. देशपांडेंपेक्षा चांगलं?’’
‘‘ऑफ कोर्स आय ऍम कॉन्फिडंट.’’
‘‘कुठल्या भाषेत लिहिणार?’’ मी भांबावून विचारलं.
‘‘कम ऑन, मॅन अर्थातच मराठीत. तसं मी इंग्लिशमध्येही तेवढंच चांगलं लिहू शकतो, पण पु. ल. देशपांडेंवर स्कोअर करायचा तर मराठीतच लिहावं लागणार काय?’’
‘‘हो-हो’’ मी नंदीबैलासारखी मान हलवीत म्हणालो, ‘‘स्कोअर म्हणजे मात ना?’’
‘‘तुमच्या चेहऱयावरून तुमचा माझ्या बोलण्यावर विश्वास दिसत नाही.’’
‘‘तसं नाही – तसं नाही’’ मी घाईघाईनं म्हणालो, ‘‘त्याचं काय आहे, पु. लं.च्या आसपासही आजवर कोणी पोहोचू शकलेलं नाही. विनोदाच्या त्या उंचीवर कोणी गेलेलं नाही. त्यामुळे ते विनोदी साहित्यातील ध्रुवतारा म्हणून ओळखले जातात.’’
‘‘जात असतील, पण मी लेखणी उचलली की ते त्या अत्युच्च स्थानावरून गडगडत खाली येतील. माझा विनोद तुम्हाला माहीत नाही म्हणून तुम्ही असं बोलताय.’’
‘‘आजवर तुम्ही कुठे कुठे, काय काय लिहिलंय?’’
‘‘कुठेच नाही.’’ हा विनोद मला आवडला.
‘‘तरीही आपण पु. ल. देशपांडेंपेक्षा भारी विनोदी लिहू शकतो असं तुम्हाला कशामुळे वाटतं?’’
‘‘तुम्हाला एक छोटासा किस्सा सांगतो.’’ डॉक्टर गळय़ातला ‘स्टेथॅस्कोप’ गोफणीसारखा फिरवत म्हणाले, ‘‘मी एका पेशंटला एका चिटोऱयावर प्रिक्रिप्शन म्हणून चार ओळी खरडून दिल्या. त्यानं त्या वाचल्या आणि तो खदाखदा हसायला लागला.’’
‘‘का?’’
‘‘तो विनोद होता. मी काही लिहिलं की तुम्हाला वाचायला देईन. मग तुम्हाला माझी योग्यता कळेल.’’
‘‘नको-नको.’’ मी घाबरून म्हणालो, ‘‘मला वाचायला देऊ नका.’’
‘‘का?’’
‘‘कारण पु. ल. देशपांडेंनी कधीच मला वाचायला दिलं नव्हतं.’’ मी म्हणालो व खदखदा हसत जीव वाचवून पळालो.

[email protected]