
>> डॉ. ज्योती धर्माधिकारी
आपले व्यक्तिगत अस्तित्व विश्वरूप करताना काव्यात्म सुंदर शब्द देणारी कवयित्री असं जिचं वर्णन केलं जातं ती लुईस ग्लुक. 2020 चा नोबेल पुरस्कार आणि त्यासोबतच साहित्यविश्वातील जगातील सगळे नामांकित पुरस्कार या कवयित्रीला प्राप्त झाले आहेत. जगातल्या प्रत्येक दुःखिताची कविता असंच तिच्या कवितांचे वर्णन केले जाते.
मी माझी आहे, माझे दुःख माझे आहे. खरं तर लुईस ग्लुकच्या याच प्रामाणिक हेतूमुळे तिच्या कवितांना वैश्विक केले. कधी त्या कविता वास्तवात जगत असतात आणि जगता-जगता शब्दरूप होतात. कधी त्या भविष्यातल्या अनामिक भीतीने थरथरतात तर कधी आशावादाने प्रफुल्लित होतात. द वाईल्ड आयरिस, मॉक ऑरेंज, द अनट्रस्टवर्दी स्पीकर, आफ्टरवर्ड या आणि अशाच वाचकांना हेलावून सोडणाऱया आपल्या अस्तित्वाची नेमकी जाणीव करून देणाऱया, भविष्यात डोकावणाऱया काही कविता आहेत.
ऐकू नका कोणीही माझे,
माझा हृदयभंग झाला आहे.
मला काहीही स्पष्ट (वस्तुनिष्ठ) दिसत नाही,
विश्वास पात्र म्हणूनच ठरत नाही मी.
हृदयाच्या जखमा या मनाच्याही जखमा असतातच ना?
(द अनट्रस्टवर्दी स्पीकर)
स्वतःचे दुःख स्वीकारताना, कविता लिहिताना आपल्या शब्दांवर विश्वास ठेवू नका असं सांगणारी ही अफलातून अमेरिकन कवयित्री आहे लुईस ग्लुक. ती म्हणते माणूस दुःखात असतो तेव्हा त्याचे शब्दही दुःखी असतात. अशा वेळी कवी निवेदक असू शकत नाही. जगभरातल्या सगळ्याच कवींसाठी ‘डोन्ट लिसन टू मी’ हा संदेश ती देते आणि सांगते कवीने संदेश देणारा असू नये. कारण ‘मला दुःखाने घेराव घातला असेल तर माझी बुद्धी शाबूत असेल असे मला वाटत नाही’ आणि म्हणूनच माझे शब्द विश्वासार्ह नाहीत असे ती म्हणते.
व्यक्तिगत आयुष्यातील सुख-दुःख शब्दांमधून मांडत असताना लुईस ग्लुकची कविता ही जगातल्या प्रत्येक दुःखिताची कविता झाली आणि याचसाठी 2020 चा नोबेल पुरस्कार लुईस ग्लुक यांना जाहीर झाला. नोबेल पुरस्कार देताना तिच्या सन्मानार्थ असे म्हणण्यात आले, ‘आपले व्यक्तिगत अस्तित्व विश्वरूप करताना तिचा काव्यात्म सुंदर आवाज (शब्द) हेच तिच्या कवितेचे मर्मस्थान आहे.’ नोबेलबरोबरच या प्रज्ञावंत कवयित्रीला साहित्यविश्वातले जगातले सगळे नामांकित पुरस्कार मिळालेले आहेत. पुलित्झर अवार्ड, नॅशनल ह्युमॅनिटीज मेडल, नॅशनल बुक ऍवॉर्ड, नॅशनल क्रिटिकल बोर्ड आणि बॉलिंगन प्राईस असे कितीतरी पुरस्कार आहेत. ‘अमेरिकेची कवयित्री’ म्हणूनही तिची निवड झाली होती.
लुईसचा जन्म 22 एप्रिल 1943 साली न्यूयॉर्कला झाला आणि ती लाँग आयर्लंडवर वाढली. फार लहानपणापासूनच ती कविता लिहित असे. तिची कविता सुरुवातीपासूनच आत्मचरित्रात्मक, स्वीकारात्मक आहे. त्या काळी कवितेतल्या शब्दरचनेची अचूकता आणि चपखल वापर यामुळे तिची प्रशंसा झाली. तिच्या नावे एकूण बारा कवितासंग्रह आणि दोन निबंधसंग्रह आहेत. ती येल विद्यापीठामध्ये सहयोगी प्राध्यापक आहे, त्याचबरोबर रोझनक्राँझ लेखिका म्हणूनही काम बघते. सध्या विद्यापीठात तिचा प्रत्येक शब्द एका प्रकल्पाअंतर्गत संग्रहित केला जात आहे.
तिच्या पहिल्याच संग्रह ‘फर्स्ट बॉर्न’ (1968) मुळे तिच्याकडे समीक्षकांच्या नजरा वळल्या. ‘फर्स्ट बॉर्न’ ही अत्यंत अचूक आणि प्रभावी शब्दरचना असलेली, कोणत्याही साहित्यिक प्रभावाशिवाय असलेली अस्तित्ववादी कविता आहे. पहिल्या संग्रहानंतर तिच्या कवितेचे स्वरूप बदलत गेले. सुरुवातीला छोटय़ा, आशयघन कविता लिहिण्याकडे तिचा कल होता तर पुढे पुढे हा आकृतिबंध विस्तारत गेला. कविता मोठी होत एक पुस्तक एक कविता अशी होत गेली. तिच्या शब्द निवडीचे अमेरिकाभर कौतुक होत असते. भाषेबद्दल दक्ष असल्यामुळे तिला एमिली डीकेंसंन आणि एलिझाबेथ बिशपच्या रांगेत अमेरिकन वाचकांनी नेऊन बसवले.
तिची गूढरम्य कविता वाचकाला तिच्या कवितेचे पात्र होण्यासाठी खुणावते. तिच्या कवितेतलं काल्पनिक पात्र वाचक बनतो आणि तोच व्यक्त व्हायला लागतो. ग्लुकची अत्यंत थेट आणि प्रभावी काव्यात्म भाषा वाचकांना तिची कविता समजण्यासाठी आणि स्वतःला आणि स्वतःच्या अनुभवांना आत्यंतिकपणे कवितेशी जवळीक साधण्यासाठी आवाज देते. कवितांमधून ती स्वतःच्या जगण्याबद्दल थेटपणे बोलत राहते. कुठलेही रूपक, उपमा, अलंकृत भाषा अशा तांत्रिकतेमध्ये न अडकता तिची कविता सर्वसामान्य साध्या माणसाची सरळसोट भाषा आहे. तरीही ती भाषा वैशिष्टय़पूर्ण सुंदर कलाकृती ठरते.
लुईस ग्लुक अत्यंत परिणामकारकपणे नैराश्य, नकार, पराभव आणि एकटेपणा याबद्दल लिहिते तेव्हा समीक्षक तिची कविता ‘उदास किंवा डार्क’ कविता आहे, असे म्हणतात. तर काही समीक्षक मानतात, तिची कविता अपमान, अयशस्वी जीवन, प्रेम याबद्दल लिहिते तेव्हा ते सौंदर्यपूर्ण व्यक्त होणे असते. ती एकाच वेळी सुखावते, हसवते आणि रडवतेही. ‘जगी सर्व सुखी असा कोण आहे?’ आणि म्हणूनच दुःख पूर्ण जगाचा एक प्रातिनिधिक आवाज म्हणून लुईस ग्लुककडे बघितले जाते.
एकदा स्टीफन रॉबर्ट हे समीक्षक ‘ऍव्हेरनो’ (2006) या काव्यसंग्रहाबद्दल बोलताना म्हणतात, ‘फार कमी कवी एकटेपणा, नैराश्य, अलिप्तता याबद्दल इतके खरे असतात की, त्यांची कविता सौंदर्यदृष्टीसहित आवडायला लागते.’ लुईस ग्लुक वास्तविकता आणि काल्पनिकता याची सांगड घालते. ते करताना ती विविध आकृत्या वापरते. थेट पुराणापासून ते निसर्गापर्यंत अनेक दाखले ती देत राहते. आपले म्हणणे प्रभावी करण्यासाठी ती रूपके तयार करते. असे असले तरी कोणत्याही छापाची कविता ती करत नाही, निसर्ग कवी, स्त्र्ााrवादी कवी असे प्रवाह ती मानत नाही.
सौंदर्यदृष्टी असेल तर कोणतेही दुःख सुगंधी करता येते. लुईस ग्लुक गेली अनेक वर्षे तेच करत आहे. ग्लुकला नेमके म्हणायचे आहे की, कविता कोणत्याही प्रकारचं वास्तव स्वीकारू शकते, ती शब्दात मांडू शकते आणि एकप्रकारे व्यक्तिगत भावनिक निचरा करू शकते. ग्लुकला नोबेल पुरस्कार जाहीर झाल्यानंतर तिच्याकडे अनेक साहित्यिक नजरा वळल्या. तिच्या अनेक कवितांची भाषांतरे वेगवेगळ्या भाषेंमध्ये झाली आणि खऱया अर्थाने अमेरिकन कवयित्री लुईस ग्लुक ही विश्व-कवयित्री बनली. समकालीन जगामध्ये भविष्यात डोकावण्याची पात्रता तिच्या कवितेत आहे, हेच तिच्या कवितेचे मर्म आहे.
(लेखिका राष्ट्रमाता इंदिरा गांधी महाविद्यालय, जालना येथे इंग्रजी विभागाच्या प्रमुख आहेत.)





























































