हनुमान चालिसावरून एवढा राडा कशाला? फडणवीस यांचा सवाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कुणी हनुमान चालिसा म्हणत असेल तर त्यावर एवढा राडा कशाला, असा सवाल करीत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना नेते व गृह विभागाने चुकीच्या पद्धतीने प्रकरण हाताळल्याचा आरोप केला. शिवसेनेच्या नेत्यांनी या प्रकरणातून सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न चालवला, पण ती मिळणार नाही अशी पुस्तीही त्यांनी जोडली.

नागपुरातून मुंबईला जाण्यापूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर ते पत्रकारांसोबत बोलत होते. ते म्हणाले, कुणाच्याही घरावर आंदोलन करायला आमचा विरोध आहे; परंतु कुणी हनुमान चालिसा म्हणणार म्हणून एवढी माणसे गोळा करायची का? कुणी हल्ला करायला जाणार नव्हते असे त्यांनी नमूद केले. राणा दांपत्य गेले असते, एखाद्या कोपऱयात हनुमान चालिसा पठण केले असते तर त्याची कुणी दखलही घेतली नसती. परंतु शिवसेनेच्या नेत्यांना या प्रकरणातून सहानुभूती मिळेल असे वाटते, पण सहानुभूती मिळणार नाही. जे काही चाललेय ते चुकीचे आहे, असे फडणवीस म्हणाले.