
जम्मू कश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात सुरक्षा दले आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. हे दोन्ही दहशतवादी जैश ए मोहम्मद संघटनेचे असल्याची माहिती मिळत आहे.
रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कश्मीर दौरा होणार आहे. या दरम्यान दहशतवादी संघटना सतत हल्ले करत आहेत. तैनातीवर असलेली सुरक्षा दलं दहशतवाद्यांचे मनसुबे उधळून लावत आहेत. कुलगामच्या मिरहामा भागात दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यानंतर या परिसराला घेराव टाकण्यात आला.
शोधमोहीम सुरू असताना दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार सुरू केला. त्याला सुरक्षा दलांनी चोख प्रत्युत्तर दिलं. या चकमकीत जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे दोन दहशतवादी ठार झाले. या दहशतवाद्यांची ओळख पटली असून त्यांची नावं सुल्तान पठाण आणि जबीउल्लाह अशी आहेत. हे दोघेही कुलगाम आणि शोपियांन जिल्ह्यात 2018 पासून दहशतवादी म्हणून काम करत होते.
या दोघांकडे मोठ्या प्रमाणात दारूगोळा सापडला असून त्याव्यतिरिक्त त्यांच्याकडून दोन एके 47 रायफल्स, 7 मॅगझिन्स, 9 ग्रेनेड मिळाले आहेत.




























































