
विहिरीचे खोदकाम सुरू असताना क्रेनचा गिअर बॉक्स तुटल्याने मोठा अपघात होऊन त्यात पती-पत्नीचा मृत्यू झाला आहे. कोपरगाव तालुक्यातील मुर्शतपूर शिवारात रविवारी ही घटना घडली आहे. जेठालाल जग्गूलाल भिल (वय 34) व त्यांची पत्नी शांती जेठालाल भिल (वय 30, रा. मोखमपुरा, ता. आशिंद, जि. भिलवाडा, राजस्थान) अशी मृतांची नावे आहेत.
मुर्शतपूर शिवारातील गणेश कारभारी राहाणे यांच्या शेतात रविवारी (दि. 24) 105 फुटांवर विहिरीचे खोदकाम सुरू होते. यासाठी जेठालाल व त्यांची पत्नी शांती हे पती-पत्नी मजूर क्रेनच्या माडीत उभे राहून विहिरीत उतरत होते. अचानक क्रेनचा गिअर बॉक्स तुटल्याने माडी वेगाने खाली 105 फूट खोल विहिरीत दगडावर आदळली. त्यात दोघा पती-पत्नीचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही मृतदेह विहिरीतून बाहेर काढले. मृतदेह शवविच्छेदनासाठी कोपरगाव ग्रामीण रुग्णालय येथे आणण्यात आले असून, कोपरगाव पोलिसांत ‘अकस्मात मृत्यू’ची नोंद करण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक भरत दाते तपास करीत आहेत.
























































