
अंधाराचा फायदा घेऊन नागरिकांना लूटमार करण्याच्या तयारीत असलेल्या सराईत टोळीला गुन्हे शाखेच्या युनिट दोनने अटक केली. त्यांच्याकडून एअरगन पिस्तूल, कोयता, मिरची पावडर, दुचाकी, मोबाइल असा 65 हजारांचा ऐवज जप्त केला. उमेश शिवाजी शिंदे (26), हितेश अजित आधवडे (20), अदित्य ज्ञानदेव शिंदे (20) भगवान बाबासाहेब रोकडे (23), भिमशा सुरेश चव्हाण (18), अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
गुन्हे शाखा युनिट दोनचे पथक भारती विद्यापीठ हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी दत्तनगर बसस्थानकाजवळ टोळके दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. लोकांना शस्त्राचा धाक दाखवून लुटण्याच्या तयारीत असल्याचे त्यांनी सांगितले. ही कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहआयुक्त संदीप कर्णिक, अपर आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त श्रीनिवास घाडगे, एसीपी गजानन टोम्पे, पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील, एपीआय वैशाली भोसले, एपीआय विशाल माहिते, उपनिरीक्षक राजेंद्र पाटोळे, अस्लम पठाण, मोहसिन शेख, संजय जाधव, साधना ताम्हाणे, उत्तम तारु, मितेश चोरमोले, निखिल जाधव, कादिर शेख, नागनाथ राख यांनी केली.
दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या सराईत टोळीला अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.
क्रांतीकुमार पाटील, पोलीस निरीक्षक, युनिट दोन



























































