
>> प्रसाद ताम्हनकर
रशिया आणि युक्रेनच्या युद्धाने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. सामाजिक, आर्थिक प्रश्नांबरोबर या आधुनिक काळातील युद्धसामग्रीने आणि युद्ध लढण्याच्या विविध पद्धतीनेदेखील जगाला विचार करण्यास भाग पाडले आहे. युद्धसामग्रीमध्ये युक्रेनपेक्षा अनेक पटींनी रशिया पुढे आहे. मात्र रशियन सैन्य फार पुढे सरकू शकलेले नाही हे स्पष्ट झाले आणि सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. इतके सुसज्ज सैन्य असताना असे का घडत होते? याचे कारण होते युक्रेनने केलेला ‘ड्रोन’चा कल्पक वापर.
रशियन सैन्याला या युद्ध मोहिमेवर कडाक्याच्या थंडीचादेखील सामना करावा लागत आहे. अशा वेळी रशियन सैन्य रात्रीच्या वेळी गाडय़ांमध्ये झोपताना उबेसाठी गाडीचे इंजिन चालू ठेवत असत. याचाच फायदा घेत रात्रीच्या अंधारात युक्रेनचे ड्रोन इंजिनच्या उष्णतेचा वेध घेऊन या गाडय़ांना लक्ष्य करून त्यांच्यावर हल्ला करत असत. यात रशियाचे प्रचंड नुकसान झाले. युक्रेनच्या या खेळीने भविष्यातील युद्धात ‘ड्रोन’ हे एक सफल आणि सरस असे हत्यार म्हणून समोर येणार आहे हे स्पष्ट झाले.
‘ड्रोन’चा इतिहासदेखील मोठा रंजक आहे. पहिल्या महायुद्धानंतर प्रचंड नुकसान झालेल्या पश्चिमी देशांना युद्धासाठी एक नवीन रणनीती आणि नवी युद्धसामग्री यांची निकड भासू लागली. शत्रूच्या दोन पावले पुढे राहण्यासाठी मानवरहित हवाई वाहने (Unmanned Aerial Vehicle) बनवण्याच्या प्रयत्नांना सुरुवात झाली.
लंडनमध्ये जन्मलेले संशोधक ‘आर्चिबाल्ड’ हे स्वेच्छेने सैन्यात सामील झाले होते. ते ‘रॉयल फ्लाइंग कॉर्प्स’मध्ये तैनात होते. या आर्चिबाल्ड यांना ‘रेडिओ मार्गदर्शन प्रणाली (Radio Guidance System) चे जनक म्हणूनदेखील ओळखले जाते. ते विमानांना दूरवरून नियंत्रित करण्याच्या अशा पद्धतीवर संशोधन करत होते की, ज्यामध्ये विमानांना एखाद्या ‘गाइडेड मिसाईल’सारखे वापरता येईल. 1917मध्ये त्यांनी अशा एका मानवरहित विमानाची चाचणीदेखील घेतली होती. मात्र ती अयशस्वी ठरली. 1918मध्ये अमेरिकन सैन्याने वैज्ञानिक ‘चार्ल्स केटरिंग’ यांना एक पायलटशिवाय उडवता येईल असा बॉम्ब बनवण्याची विनंती केली होती. त्यांनी बनवलेल्या अशा बॉम्बला ‘केटरिंग बग’ असे नाव देण्यात आले होते. पारंपरिक विमानाप्रमाणे दिसणाऱया या बॉम्बची लांबी 3.08 मीटर आणि रुंदी 4.5 मीटर होती. 40 मैल दूरपर्यंतच्या लक्षाचा वेध घेण्यासाठी त्याची निर्मिती करण्यात आली होती. त्याला ‘निरर्थक वाहन’ असेदेखील नाव पडले होते. मात्र याचा वापर कधीच करण्यात आला नाही.
भविष्यात हे तंत्रज्ञान अधिक सरस होत गेले. या बदलत्या तंत्रज्ञानाची झलक आखाती युद्धात संपूर्ण जगाला पाहण्यास मिळाली. लक्ष्याचा अचूक वेग आणि नागरिकांना होणारा धोका कमी अशा कारणांमुळे मानवरहित वाहनांचा वापर मोठय़ा प्रमाणात वाढला. याचाच परिणाम म्हणजे आखाती युद्धात अमेरिकेच्या नेतृत्वाखाली लढणाऱया सैन्याचे फार कमी नुकसान झाले. ‘9/11’च्या घटनेनंतर अफगाणिस्तानविरुद्ध युद्धात अमेरिकेकडून अशा वाहनांचा वापर मोठय़ा प्रमाणात करण्यात आला. अफगाणिस्तानमधील दुर्गम भागात टेहळणी करण्यासाठी आणि अतिरेक्यांचे तळ नष्ट करण्यासाठी अशा हवाई वाहनांचा खूप मोठा उपयोग झाला होता.
सैन्यावर अब्जावधी रुपये खर्च न करू शकणाऱया अनेक देशांसाठी ‘ड्रोन’ हा एक प्रभावी पर्याय म्हणून समोर येत आहे हे नक्की!





























































