
>> नीती मेहेंदळे
वैशाखाचं ऐन मध्यान्हीचं ऊन डोक्यावर घेऊन गाडी पळत होती, पण खिडकीतून मात्र एक हिरवा दिलासा अखंड झुळझुळत होता. आश्चर्य वाटून खिडकीबाहेर डोकावून पाहिलं तेव्हा पक्क्या डांबरी रस्त्याच्या दोन्ही बाजूंना गारव्याची झाडं कमान करून उभी दिसली. कार्ले खिंडीतून मांडव्याला जाणारी ही एक सुखद समृद्ध वाट. अशा रणरणत्या उन्हात जर इतकं सुखावह स्वागत असेल तर त्या वाटेचे आवडते ऋतू किती आनंदाने नांदत असतील इथे, असा विचार मनात तरळून गेला. नकाशावर न शोधता कधी कधी काही गावं प्रवासात आपल्याला भेटून जातात आणि चिरंतन सुखद अशा स्मृती मागे ठेवून जातात.
अलिबागहून मांडव्याचं टोक गाठायचं म्हणजे उजव्या बाजूला कणकेश्वराचा डोंगर ठेवायचा आणि पश्चिमेकडे समुद्र हा तर राजमार्गी भूगोल झाला, पण कणकेश्वराचा डोंगर डाव्या बाजूला ठेवूनसुद्धा मांडव्याला जाता येतं हा आपल्याला खुणावणाऱया आडवाटांच्या पदरांपैकी एक पदर. या मार्गांमध्ये ठळक फरक हा की, उजव्या बाजूला अंबा नदीचं रूपांतर हळूहळू धरमतरच्या खाडीत होऊन पात्र रुंदावतं ते इथेच कुठेतरी. अशा आडवाटांवर खरंखुरं आणि निवळशंख कोकण गवसतं हा माझा अनुभव आहे. मांडवा, रेवस, हाशिवरे, शिरवली, चिंचवली करत कार्ले खिंडतर्फे अलिबागमधे शिरता येतं, तोच रस्ता धरला होता. पैकी शिरवली-चिंचवली ही देवळांची गावं. या परिसरात बहिरीदेवाची कृपादृष्टी असावी असं एक आपलं जाणवलं. शिरवलीचा बहिरीदेव हा तिथला ग्रामदेव आणि त्याचं मंदिरही मोठं देखणं बांधून काढलेलं दिसलं. थोडं पुढे नदीजवळ गेलं तर मानकुळे, बहिरीचा पाडा या गावांमध्ये पण बहिरीदेवाची स्थानं सापडली.
तळकोकणापासून ठाण्यापर्यंत पसरलेल्या अपरान्तात ब्राह्मणदेव नावाच्या ग्रामदेवतेची बापदेव, बापूजीदेव अशी बदलत गेलेली रूपं पण या परिसरात दिसली, पण चिंचवलीचं जीर्णोद्धारित भुवनेश्वराचं मंदिर हे या रस्त्यावरचं सर्वात प्राचीन आणि मुख्य आकर्षण होतं. चिंचवली आणि त्याच्या आजूबाजूच्या 16-17 गावांनी पुढाकार घेऊन बांधलेलं मंदिर खरं तर छोटेखानी आहे. मूळ मंदिराला फक्त एक लहानसा सभामंडप आणि गाभारा होता हे मंदिर बघताना लगेच लक्षात आलं. अलीकडच्या काळात देवळाच्या आजूबाजूला अधिक बांधकामं करून मंदिराचा प्राकार वाढवलेला दिसला. त्याचा निश्चित असा काळ कुठेही नोंदला गेलेला नसला तरी बांधकामाच्या धाटणीवरून ते कणकेश्वराच्या कालखंडातील म्हणजे 16-17 व्या शतकातले स्थापत्य वाटते. जुन्या गाभाऱयाला आता रंगवलं असलं तरी त्याचं मूळ स्थापत्य काही केल्या झाकलं जात नाही हा त्यातल्या त्यात दिलासा. गाभाऱयाचं प्रवेशद्वार जेमतेम एका माणसाला जाता येईल इतकं अरुंद असून आत शिरतानाच त्याच्या जाडजूड भिंती लक्ष वेधून घेत होत्या. त्याचं दगडी वितान म्हणजेच छतदेखील नजरेत भरेल इतकं सुंदर होतं. इतक्या जाड भिंती आणि अरुंद प्रवेशद्वार असते तेव्हा सहसा मंदिरात रात्री सुरक्षिततेसाठी वाटसरू वस्ती करत असावेत असा अंदाज बांधता येतो.
गाभाऱयात काही कोनाडे असून त्यात जुनं मंदिर असल्यापासूनची महिषासुरमर्दिनी, कालभैरवाची पाषाणातली शिल्पं ठेवलेली दिसली. मंदिराच्या अंगणात एक वीरगळही ठेवलेला दिसला. तो शेजारच्या तलावातून मिळाला अशी ग्रामस्थांनी माहिती दिली. भुवनेश्वराच्या मंदिराच्या उजव्या बाजूस परिसरात अनेक मोठाल्या विहिरी आढळल्या. या देवळाच्या मागच्या बाजूला डोंगर आहे आणि त्यावरून वाहत येणाऱया पाण्यावर ग्रामस्थांनी धरण बांधून काढलं आहे असं समजलं. या धरणामुळे भुवनेश्वराच्या आजूबाजूच्या दहाबारा गावांना पाणीपुरवठा होतो आहे ही कौतुकास्पद गोष्ट. मंदिराचे सध्याचे समितीचं काम पाहणारे अधिकारी मंदिराच्या आणि परिसराच्या विकासासाठी जागरूक दिसले. सध्याच्या मंदिरालगतच्या ऐतिहासिक धर्मशाळेच्या वास्तूचा विस्तार करण्यामागे भाविकांसोबत गावाच्या दृष्टीने उपयोगी विचार केलेला दिसला. गावातल्या लग्नसराईचा खर्च वाचविण्यासाठी धर्मशाळेच्या जागेचा उपयोग करता येईल, ज्यायोगे वरवधू पक्षाकडून देवालयासाठी भाडे खर्च कमीत कमी आकारून गावकऱयांना मदत करण्याची भावना दिसली.
देवळाला मिळालेली ब्रिटिशकालीन सनद आणि त्याची कागदपत्रं या ट्रस्टकडे सुरक्षित आहेत. तोच काय तो त्यांच्यापाशी असलेला देवळासंबंधित ऐतिहासिक दस्तऐवज. कणकेश्वराच्या देवळाच्या मागच्या बाजूस डोंगर आपली छाया या चिंचवलीसारख्या उतरंडीच्या गावांवर धरून आहे आणि त्या उदार सावलीत निवांत झालेलं भुवनेश्वर त्या पट्टय़ातल्या खेडय़ांवर आपली मायेची पखरण घालत आहे असं सुंदर चित्र मला गाव सोडताना जाणवत राहिलं.




























































