ज्येष्ठ अभिनेत्री प्रेमा किरण यांचे निधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ऐंशी आणि नव्वदीच्या दशकात अनेक सुपरहिट मराठी चित्रपटांत विविधांगी भूमिका साकारणाऱया तसेच आपल्या सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर करणाऱया ज्येष्ठ अभिनेत्री प्रेमा किरण यांचे रविवारी पहाटे मुंबईत हृदयविकाराने निधन झाले. त्या 61 वर्षांच्या होत्या.

प्रेमा यांनी ‘धुमधडाका’, ‘दे दणादण’, ‘गडबड घोटाळा’, ‘माहेरचा आहेर’, ‘गाव थोर पुढारी चोर’, ‘वाक्या’, ‘पागलपन’, ‘अर्जुन देवा’ आदी चित्रपटांत महत्त्वपूर्ण भूमिका निभावल्या. ‘धुमधडाका’मध्ये त्यांनी साकारलेली ‘अंबाक्का’ आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. दरम्यान, दुपारी त्यांच्या पार्थिवावर ओशिवरा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

प्रेमा किरण यांचा जन्म पुण्यातील. वडील रेल्वेत नोकरीला असल्याने वारंवार होणाऱया बदल्यांमुळे कधी नागपूर, कधी मुंबई असे शहर बदलावे लागायचे. वयाच्या सातव्या वर्षापासून अनेक छोटय़ामोठय़ा ऑर्पेस्ट्रामध्ये त्यांना नृत्याची संधी मिळाली. पुढे त्यांना ‘दीप जलता रहे’ या हिंदी नाटकात काम करण्याची ऑफर मिळाली. या संधीचे त्यांनी सोने केले. त्यानंतर ‘अश्रूंची झाली फुले’, ‘साष्टांग नमस्कार’, ‘लवंगी मिरची कोल्हापूरची’, ‘गाढवाचं लग्न’, ‘ही श्रींची इच्छा’ अशा अनेक प्रायोगिक, व्यावसायिक नाटकांसह झाडीपट्टी नाटकांत त्यांनी काम केले. त्यांच्या निधनामुळे मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे.