
राज्यातील वाढत्या वाहन अपघाती मृत्यूला मोटार ट्रेनिंग स्कूलच्या प्रशिक्षणाचा खालावलेला दर्जाही कारणीभूत असल्याचे वारंवार निदर्शनास आले आहे. त्यामुळे परिवहन विभागाने अशा ढिसाळ कारभार असलेल्या मोटार ट्रेनिंग स्कूलची झाडाझडती घेण्याची मोहीम सुरू केली आहे. 1 ते 31 मे पर्यंत राज्यभर ही मोहिम सुरू राहणार असून यात दोषी स्कूलवर कारवाई करण्यात येणार आहे.
वाहन अपघातात मृत्यू व जखमी होणार्यांची वाढती संख्या, मोटार ट्रेनिंग स्कुलमधील प्रशिक्षणाचा ढासळलेला दर्जा व होणारे गैरप्रकार आदी विषयावर वृत्तपत्रे, समाजमाध्यमे व विधीमंडळातही मुद्दे उपस्थित झाले आहेत. मोटार ट्रेनिंग स्कूलच्या परिस्थितीत सुधारणा होणे आवश्यक आहे. यासाठी शिकाऊ अनुज्ञप्ती व वाहन चालक अनुज्ञप्ती देताना घेतल्या जाणार्या चाचण्यांचा दर्जा उंचवण्यासाठी ही मोहिम राबविण्यात येणार आहे. वाहन चालकांना मोटार ड्रायव्हिंग स्कुलमधून मिळणार्या प्रशिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी ही कारवाई केली जात आहे.
मोटार वाहन प्रशिक्षण केंद्रास परिवहन विभागाने परवाना देताना तेथील सोयीसुविधा प्रशिक्षक, प्रशिक्षण वाहने, अभ्यासक्रम, ठेवावयाच्या नोंदी इ. बाबींच्या तरतुदी मोटार वाहन कायदा 1988 व त्यातील नियम 24 ते 29 मध्ये नमूद केल्या आहेत. या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी होण्यासाठी परिवहन विभागाने सर्व प्रादेशिक-उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकारी व कर्मचार्यांवर मोटार ट्रेनिंग स्कूलची झाडाझडती करण्याची जबाबदारी सोपविली आहे.





























































