
एसी लोकलच्या आणि साध्या लोकलच्या फर्स्ट क्लासच्या एकेरी प्रवासाचे तिकीट दर कमी करण्याची घोषणा रेल्वे राज्यमंत्र्यांनी केल्यानंतर त्याची अंमलबजावणी प्रत्यक्षात उद्या 5 मे पासून होणार आहे. त्यामुळे कधी तरी प्रवास करणार्या किंवा पर्यटन म्हणून प्रवास करणार्यांना फायदा होणार असला तरी पास काढून रोजचा प्रवास करणार्या चाकरमान्यांना काही उपयोग होणार नाही. त्यामुळे ओला व उबरने प्रवास करणार्या गटाला एसी लोकलचा एक जलद व स्वस्त पर्याय उपलब्ध झाला आहे.
भायखळा स्थानकाचे हेरीटेजदृष्ट्या जीर्णोद्धार व सुशोभिकरण पूर्ण झाल्यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात शुक्रवारी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी एसी लोकलच्या ऐकरी प्रवासाच्या तिकीटात पन्नास टक्के कपात करण्याची घोषणा केली होती. त्यामुळे फर्स्टक्लासच्या एकेरी प्रवासाच्या तिकीटातही सुसूत्रीकरण केल्याने तेही स्वस्त झाले आहे. याची अमलबजावणी 5 मेपासून सुरू होत असून त्याप्रमाणे रेल्वेची माहिती तंत्रज्ञान शाखा ‘क्रिस’ ने तिकीट यंत्रणेत बदल केले आहेत.
रेल्वेने एसी लोकलचा प्रतिसाद वाढण्यासाठी जरी सिंगल जर्नी तिकीटाचे भाडे निम्याने घटविले असले तरी यातून रेल्वेचाच फायदा होणार आहे. उपनगरीय लोकलचा पास काढणार्यांची संख्या 95 ते 98 टक्के आहे. केवळ 1 ते 2 टक्के प्रवासी आयत्यावेळी कार्ड तिकीट काढून प्रवास करणारे असतात. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना यातून दिलासा मिळालेला नाही.
ओला व उबरचा प्रवास महागल्याने त्यामधून प्रवास करणार्यांना आता एसी लोकल एक चांगला पर्याय मिळाला असल्याचे म्हटले जात आहे. मध्य रेल्वेवर एसी लोकलच्या 60 तर पश्चिम रेल्वेवर 20 अशा एकूण 80 फेर्या सध्या धावत आहेत. त्यात सीएसएमटी ते बदलापूर टिटवाळा सेक्शनमध्ये 44 फेर्या तर हार्बरवर सीएसएमटी ते पनवेल 8 फेर्या तर सीएसएमटी ते गोरेगाव 8 फेर्या अशा एकूण 60 फेर्या मध्य रेल्वेवर चालविण्यात येत आहेत.
मध्य रेल्वेचे एसी व फर्स्टक्लासच्या प्रवासी तिकीटाचे नवे व जुने दर
सीएसएमटी- अंतर- एसी नवा-जुना फर्स्ट नवा-जुना
बदलापूर 68 कि.मी. 240-120 185-105
टिटवाळा 65कि.मी. 220-115 170-105
अंबरनाथ 60 कि.मी. 220-115 170-105



























































