
एसी लोकल आणि नॉन एसी फर्स्टक्लासच्या प्रवासी तिकीटाचे दर कमी झाल्याच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांनी एकदम तुंडूंब प्रतिसाद न देता थोडा सावध प्रतिसाद दिला आहे. दुपारी दोन वाजेपर्यंतच्या केवळ 14 तासांच्या मिळालेल्या आकडेवारीनूसार मध्य रेल्वेच्या एसी लोकलची 2308 तर पश्चिम रेल्वच्या 2449 सिंगल जर्नी तिकिटे विकली गेली आहेत. त्यामुळे पहिल्या दिवशी मिळालेला हा प्रतिसाद हळूहळू वाढत जाईल असे म्हटले जात आहे.
एसी लोकलचे तिकीट दर आधी फर्स्टक्लासच्या तिकीट दराच्या 1.3 पट जादा असल्याने प्रवासी नाराज होते. रेल्वे राज्यमंत्र्यांनी गेल्या शुक्रवारी झालेल्या जाहीर कार्यक्रमात एसी लोकलच्या सिंगल जर्नी तिकीटाचे दर निम्म्याने कमी करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर रात्री साध्या लोकलचे फर्स्टक्लासचे तिकीटांचे दर कमी केल्याचे परिपत्रक जारी करण्यात आले. यामुळे नैमित्तिक प्रवास करणार्यांना फायदा होणार असून ओला किंवा उबरने ट्रॅफिकमध्ये अडकण्यापेक्षा प्रदुषणमुक्त वातानुकूलित लोकलचा प्रवास तुलनेने स्वस्त झाला आहे. मात्र,सिझन पासचे दर चढेच असल्याने एसी लोकल अजूनही सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेरच आहे. त्यातच रविवार आणि सार्वजनिक सुट्ट्यांना एसी लोकल मेन्टेनन्ससाठी रजेवर असल्याने कुटुंबकबिल्यासह प्रवासासाठी बाहेर पडणार्या प्रवाशांची अडचण होत आहे.
रात्रीपर्यंत आदल्या दिवसाचा रेकॉर्ड तुटणार
एसीचे दर कमी होण्यापूर्वी मध्य रेल्वेच्या एसी लोकलच्या कार्ड तिकीटांची विक्री 4 एप्रिल रोजी 24 तासांत 2, 803 कार्ड तिकीटे विकली जाऊन 3,102 प्रवाशांनी प्रवास केला होता. तर आज तिकीट दर घटल्याच्या पहिल्याच दिवशी 5 एप्रिलच्या दु.2 वाजेपर्यंत (14 तास) मध्य रेल्वेच्या एसी लोकलची 2,308 कार्ड तिकीटे विकली जाऊन 2, 543 प्रवाशांनी प्रवास केल्याने 2 लाख 30 हजार 230रूपयांची कमाई झाली आहे. तर याच दिवशी मध्य रेल्वेच्या साध्या लोकलच्या फर्स्टक्लासची 2132तिकीटे विक्री होऊन 2880 प्रवाशांनी प्रवास केल्याने 2लाख 21 हजार 365 रूपयांची कमाई झाली आहे.
पश्चिम रेल्वेच्या एसी लोकलची 2,449 कार्ड तिकीटे विकली जाऊन 2, 681 प्रवाशांनी प्रवास केला तर 2 लाख 39 हजार 810 रूपयांची कमाई झाली. तर साध्या लोकलच्या फर्स्टक्लासची 2,762 तिकीट विक्री होऊन 3,874 प्रवाशांनी प्रवास केल्याने 28 हजार 039रूपयांची कमाई झाली आहे.
मध्य व पश्चिम रेल्वेचे गुरूवार दु.2 वाजेपर्यंतचे तिकीट विक्रीचे आकडे
वर्गवारी मध्य पश्चिम
एसी 2,308 2,449
कमाई 2,30,230 2,39,810
फर्स्ट 2,132 2,762
कमाई 2,21,365 28,039

























































