
>>रमेश चिल्ले
आहे.कोणत्याही लेखक, कवीच्या जीवनात लहानपणी तो ज्या समाजात, वस्तीत, कॉलनी-गावात राहत असतो त्या परिसरात अनेक लहान सहान घटना, प्रसंग घडून गेलेल्या असतात. त्या गोष्टी कळत नकळत आपल्या मनात घर करून राहतात. मोठेपणी त्यातली एखादी प्रतिभा सराफसारखी व्यक्ती ‘बालकथा लिहा, जमेल तुम्हाला’ असे म्हटल्यावर त्यांच्यातली लेखिका जागी होते अन् थेट मागे बालपणीच्या काळात प्रवेश करतात.
घराघरात टीव्ही, मोबाईल, इंटरनेट कॉम्प्युटर, टॅबचा प्रसार आज सगळीकडे झालेला आहे. कार्टुन, कॉमिक्स, लिटल चॅम्प, स्पायडरमॅन, रोबोटची पुस्तके भरपूर असतानाही मुले चांगल्या बालसाहित्याकडे मोठय़ा प्रमाणात वळताना पाहतोय. त्याच तोडीतील ‘मिठू मिठू’ या पुस्तकातून सकारात्मकतेच टॉनिक पाजणाऱया कथा आपल्या हाती प्रतिभाताईंनी दिल्या आहेत.
‘पाठीवरची थाप’सारखी कथा खुद्द लेखिकेच्या आयुष्यातच घडलेली आहे असे वाटते. एका कचरावेचक मुलाची मुलाखत घेऊन तिने सर्वांना आश्चर्याचा धक्काच दिला आहे, अन् सरळधोट विचार करणाऱयांना चक्रावून सोडलेले. त्यांनी ही कथा अशा पद्धतीने रंगवली की शेवटपर्यंत वाचकांच्या मनाची पकड ढिली होतच नाही.
‘अभिमान’ ही एक वेगळ्याच धाटणीची कथा. आगीचा संशय आल्याने दुसऱयाच्या मदतीने दार उघडून शहानिशा करण्याचे प्रसंगावधानही शिकवते. तर ‘भद्रकाली’ मध्ये भद्रकाली हा लहानपणी दोनशे रुपये चोरतो, त्यावरून त्याचे कारनामे मित्राकरवी त्याच्या आईवडिलांच्या कानावर घातले जाते. कारण त्याला पुढे वाईट वळण लागू नये म्हणून केलेले प्रयत्न, त्यातून तो सुधारतो व अभ्यासात प्रगती करतो व पुढे तो मोठा पोलीस अधिकारी होतो. ही साधी गोष्ट, पण एका साध्या प्रसंगातून एखाद्याचं आयुष्य बदलून जाते ही अशा कथेची जमेची बाजू आहे.
‘ऑल दि बेस्ट, बेटा’ ही कथा शाळेच्या वातावरणात घडत गेलेली. नाटकाच्या सिलेक्शनमधून गैरसमज व पुढे रचनाला शाळेतील अभ्यासाच्या व एकंदरीत परफॉर्मस्वरून सर्वोत्तम पुरस्कार दिला जातो तेव्हा तिची मनःस्थिती लेखिकेने खुबीने मांडली आहे. पुढे काय? पुढे काय? ही उत्सुकता ताणली जाते यातच कथेचे श्रेय सामावलेले असते. ‘मिठू मिठू’ अन् ‘दिवा लावणे’ याही खूपच चांगल्या कथा ओघवत्या शैलीत लेखिका प्रतिभाताईंनी मांडल्या आहेत. व्यास क्रिएशनने उण्यापुऱया साठ पानांत छोटेखानी व सुबक असा कथासंग्रह काढला आहे. लेखिकेची कन्या कु. निकिताने पौर्णिमेच्या चांदण्या रात्रीचे व चंद्राच्या लख्ख प्रकाशात झाडाच्या फांदीवर बसून पुस्तक वाचणाऱया मुलाची प्रतिमा, जणू टिपूर चंद्रचांदण्यात तो पुस्तक वाचण्यात गढून गेलेला. वर चढण्यासाठी सीडी व पुस्तकांची रगोली रचलेली, मागे काळय़ा रात्रीच्या पार्श्वभूमीवर पाणी, समुद्र, चांदण्या अशा देखण्या मुखपृष्ठाचे सुबक व सुंदर रेखाटन कसलेल्या चित्रकारागत वाटते. ही जमेची बाजू आहे.
आजकालच्या स्क्रीनला चिकटलेल्या बाल व किशोरांना या संग्रहातल्या कथा नक्कीच मुखपृष्ठावरील टायटलनुसार सृजन संस्काराचे आणि सकारात्मकतेच्या टॉनिकचा बूस्टर डोसच म्हणावा लागेल. एकदा का पुस्तक हाती घेतले की अधाशागत सगळ्याच कथा वाचल्याशिवाय कोणत्याही वयातील वाचक ते खाली ठेवणारच नाही एवढी नक्कीच खात्री देता येईल.
मिठ मिठू
लेखिका:- प्रतिभा सराफ
प्रकाशक:- व्यास क्रिएशन
पृष्ठ:- 58, मूल्य:- रुपये 100/-


























































