महापालिकेच्या दर्जामुळे इचलकरंजीच्या विकासाला गती मिळेल-उदय सामंत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इचलकरंजी शहराला महानगरपालिकेचा दर्जा मिळाला आहे. यामुळे आता विकासकामांना अधिक गती मिळेल, असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी केले आहे.

इचलकरंजी नगरपालिकेचे महापालिकेत रूपातंर करून आणण्यात यश मिळाल्याबद्दल शिवसेना खासदार धैर्यशील माने यांचा सर्वपक्षीय सत्कार करण्यात आला. यावेळी शिवसेना कोल्हापूर जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव, उपजिल्हाप्रमुख महादेव गौड, शहरप्रमुख सयाजी चव्हाण, माजी आमदार सुजित मिणचेकर, सत्यजित सरुडकर भाजपचे तानाजी पोवार, राष्ट्रवादीचे मदन कारंडे, नितीन जांभळे, काँग्रेसचे प्रदेश सचिव शशांक बावचकर, राहुल खंजिरे आदी उपस्थित होते.

मंत्री सामंत म्हणाले, तांत्रिक अडचणी असल्या तरी खास बाब म्हणून इचलकरंजीला महानगरपालिका म्हणून महाविकास आघाडीने मान्यता दिली आहे. 98 कोटींचे सहायक अनुदानही या पालिकेला शासनाने नुकतेच दिले आहे. विकासकामांसाठी शासन मदत करीत राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

खासदार धैर्यशील माने म्हणाले, इचलकरंजी महापालिका होणे हा एक सुवर्णक्षण आहे. गेल्या सहा वर्षांत प्रथमच महापालिका होण्याचा मान राज्यात इचलकरंजीला मिळाला आहे. शहराच्या भौगोलिक रचनेवरच ही महापालिका झाली आहे. कोणतीच हद्दवाढ नाही. तसेच नागरिकांवर कोणताही अतिरिक्त बोजा पडणार नाही. नवीन करवाढ होणार नाही. उलट राज्य शासनाकडून मनपा होताना विकासकामांसाठी 100 कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे. इचलकरंजीला आता महापौर होणार असून, कोल्हापूरप्रमाणे ‘ड’ वर्ग दर्जा मिळेल. सुळकुड या पाणी योजनेतून पाणी मिळण्यासाठी चार वर्षे लागतील. दरम्यान, ‘आहे तसा पाणीपुरवठा’ सुरळीत ठेवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.