‘सह्याद्री’च्या बफर झोनमध्ये विहिरीसाठी जिलेटिनचा स्फोट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमधील चिरंबे गावात शेतातील विहिरीसाठी विनापरवाना जिलेटिन स्फोटकाचा वापर करून स्फोट केल्याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. रात्रीच्या नीरव शांततेत या शक्तिशाली स्फोटामुळे कोयनेचा दक्षिण विभाग हादरला होता. तसेच चिरंबे गावातील अनेक घरांच्या भिंतींना तडे गेले आहेत. संतोष अशोक पवार (वय 36, रा. निसरे) व इंद्रनाथ योगी (वय 40, रा. सांगली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

कोयनेच्या दक्षिण भागात चिरंबे गाव आहे. तेथील अभय थोरात यांच्या मालकीच्या क्षेत्रात विहिरीचे खोदकाम सुरू आहे. त्यासाठी पवार व योगी या दोघांनी विनापरवाना स्फोटकांचा वापर केला. त्यांनी 25 जिलेटिनच्या कांडय़ा फोडून शक्तिशाली स्फोट केल्यामुळे चिरंबेतील अनेक घरांच्या भिंतींना तडे गेले आहेत. ग्रामस्थांनी कोयना पोलिसांत तक्रार दिली. कोयना पोलिसांनी तेथे छापा टाकला. या स्फोटप्रकरणी कोयना पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात आणखी 115 जिलेटिनच्या कांडय़ांसह ट्रक्टर जप्त करण्यात आला आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनच्या गावातच की घटना घडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. ट्रक्टरचालक संतोष पवार व इंद्रनाथ योगी यांना अटक केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक नवनाथ गायकवाड तपास करीत आहेत.