
अलार्म चेन पुलिंगचे वाढते प्रकार पाहता मध्य रेल्वेने रेल्वे स्थानकांवरील अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी प्लॅटफॉर्म तिकिटांच्या दरात पंधरा दिवसांसाठी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वेने लांब पल्ल्याच्या गाडय़ा सुटणाऱया सीएसएमटी, दादर, एलटीटी, ठाणे, कल्याण, आणि पनवेल टर्मिनसच्या प्लॅटफॉर्म तिकिटाचे दर 10 रुपयांवरून 50 रुपये करण्याचा निर्णय घेतला आहे.
गोदान एक्स्प्रेसची अर्लाम चेन खेचल्याने ही ट्रेन काळू नदीच्या पुलावरच टिटवाळा आणि खडवलीदरम्यान बंद पडल्याने सहाय्यक लोको पायलट सतीश कुमार यांना आपला प्राण धोक्यात घालून ही ट्रेन चालू करावी लागली होती. त्यामुळे लांब पल्ल्यांसह उपनगरीय लोकलचे वेळापत्रकही बिघडत आहे. त्या पार्श्वभूमीवर सध्या उन्हाळी हंगामात उत्तरेकडे जाणाऱया गाडय़ांना होत असलेली गर्दी व चेन पुलिंगच्या घटनांमध्ये झालेली वाढ यामुळे अनावश्यक गर्दीला प्रतिबंध करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे उद्या 9 ते 23 मेपर्यंत सर्व लांब पल्ल्यांच्या गाडय़ा सुटणाऱया टर्मिनसचे प्लॅटफॉर्म तिकीट दर 10 रुपयांवरून 50 रुपयांपर्यंत वाढलेले असतील असे मध्य रेल्वेने म्हटले आहे. कोरोना काळातदेखील सोशल डिस्टन्सिंग राखण्यासाठी प्लॅटफॉर्मवरील गर्दी कमी करण्यासाठी प्लॅटफॉर्म तिकिटांच्या दरात वाढ करण्यात आली होती.
























































