15 दिवसांत निवडणुका हा गैरसमज : शरद पवार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 15 दिवसांत जाहीर करा, हा गैरसमज आहे. निवडणूक प्रक्रियेला दोन महिने लागतील. जेथून थांबविले, तेथून पुन्हा प्रक्रिया सुरू होणार आहे. याबाबत कोर्टाच्या निर्णयावर बोलण्यासारखे खूप आहे; पण तुम्हाला आणि आपल्यालाही नोटीस येईल,’ अशी सूचक प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी दिली आहे.

पवार पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, केंद्र सरकारविरोधात सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येणे गरजेचे आहे. त्याबाबतची प्रक्रिया सुरू आहे. काँग्रेसचे शिबीर सुरू आहे. आमच्याही बैठका सुरू आहेत, मात्र आमच्यातदेखील मतभेद असून, ते लवकर दूर करणे गरजेचे आहे. आगामी निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र येईल का, याबाबत चर्चा झालेली नाही, मात्र राष्ट्रवादीची चर्चा झाली आहे. वेगवेगळ्या चिन्हांवर निवडणूक लढवून निकालानंतर एकत्र येऊ, असे अनेकांचे मत आहे, तर अनेकजण आपण एकत्र निवडणूक लढवू, असे सांगत असल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले.

महागाईवर चळवळी वाढतील

‘देशात पेट्रोल-डिझेल, स्टीलचे भाव वाढले आहेत. त्याचे चटके सर्वसामान्यांना बसत असून, वाढत्या महागाईवर लोक बंड करणार नाहीत; पण चळवळी वाढतील,’ असे शरद पवार यांनी निदर्शनास आणले. आज शिर्डीसारख्या ठिकाणी भोंगा बंद झाला; पण तिथला सर्व समाज भोंगे सुरू करा, अशी मागणी करीत आहे. त्यामुळे कधी कधी लोकांच्या भावनेचा विचार करावा लागतो,’ असे सांगत त्यांनी भोंग्यांच्या राजकारणावर टीका केली.