
खुसखुशीत मनोरंजनाची मेजवानी घेऊन आलेल्या ‘आमने सामने’ या नाटकाने अल्पावधीतच प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. या नाटकाचा शतक महोत्सवी प्रयोग रविवार, 15 मे रोजी गडकरी रंगायतन, ठाणे येथे होणार आहे. या प्रयोगाला ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर, ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, अभिनेता जितेंद्र जोशी, आरजे दिलीप, दिग्दर्शक रवी जाधव, लेखक दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे आदी उपस्थित राहणार आहेत.
अल्पावधीत ‘आमने सामने’ नाटकाने अनेक पुरस्कारांवर मोहोर उमटवली आहे. विशेष म्हणजे नाटकाची आगामी आंतरराष्ट्रीय संमेलनात ही निवड झाली आहे. ऑगस्ट महिन्यात अमेरिकेतील न्यू जर्सी अटलांटिक सिटी येथे होणाऱया बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या संमेलनात तसेच ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथे 22, 23, 24 सप्टेंबर 2022 रोजी होणाऱया अखिल ऑस्ट्रेलिया मराठी संमेलनातही ‘आमने सामने’ नाटकाची निवड झाली आहे. याबद्दल आनंद व्यक्त करताना अभिनेते मंगेश कदम यांनी नाटकाला मिळत असलेला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद पाहता हे नाटक 500 प्रयोगांचासुद्धा टप्पा गाठेल असा विश्वास व्यक्त केला. मंगेश कदम, लीना भागवत, मधुरा देशपांडे, रोहन गुजर यांच्या अभिनयाने रंगलेल्या या दोन अंकी नाटकात मागच्या पिढीने काळानुसार नव्याचा स्वीकार करायला हवा हा विचार रंजकरीत्या मांडला आहे. नाटकाचे दिग्दर्शन नीरज शिरवईकर यांनी केले आहे.
































































